‘यशवंत’ कारखान्याचा इच्छुकांचा आकडा ‘तीनसो’ पार! निवडणूक बिनविरोध प्रयत्नांना बसणार हारताळ, तगडे इच्छुक मैदानात..!

उरुळीकांचन : संचालक मंडळाच्या अनागोंदी कारभाराने गेल्या तेरा वर्षापासुन बंद अवस्थेत असलेला व सहकारातील अस्तित्वाच्या घटका मोजत असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरच्या दिवशी म्हणजे शुक्रवार (दि.९) रोजी तीनशे वीस उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे बंद कारखान्याच्या निवडणूकीसाठी हवेलीत पुन्हा प्रतिष्ठा जागृत झाली असून सभासद या उमेदवारांकडून निष्ठेने काम करणार का म्हणून प्रश्न उपस्थित करु लागले आहे.

सन २०१०-२०११ च्या गळीत हंगामात संचालक मंडळाचा अनागोंदी कारभार व त्यामुळे ओढवलेल्या अर्थिक अनियमितेमुळे ‘यशवंत’ कारखान्याला ‘कुलूप’ लागण्याचे संकट ओढवले आहे. गेली १३ वर्षे अथक परिश्रम घेऊनही ही तालुक्याची कामधेनू सुरू होऊ शकली नाही हे दुर्दैव तालुक्याला पहावे लागले आहे. तर सभासद व कामगार या आर्थिक टाळेबंदीने देशोधडीला लागले आहे.
मात्र राज्य सरकारच्या सकारात्मक पाठबळ व सभासदांनी दिलेल्या न्यायालयीन लढ्यामुळे यशवंत कारखान्याची तब्बल १५ वर्षानंतर निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला आहे. तर संचालक मंडळ अस्तित्वात येऊन या संस्थेवर परिणामकारक निर्णय संचालक मंडळामार्फत घेण्याचा मार्ग मोकळा होऊन सभासदांना हा कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी एक संधी प्राप्त झाली आहे.

कारखान्याच्या निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा प्रक्रियेत शुक्रवारी (दि.९) अखेरच्या दिवशी २१ जागांसाठी तीनशे वीस उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी प्रमुख अर्जांत कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रा. के .डी .कांचन, माजी उपाध्यक्ष राजेंद्र टिळेकर, माजी संचालक पांडुरंग काळे, रामदास चौधरी, महादेव कांचन यांच्यासह कारखान्याच्या अनेक माजी संचालकांच्याबरोबरच, कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक प्रकाश जगताप, राजाराम कांचन, प्रशांत काळभोर, हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य हिरामण काकडे, सुभाष जगताप, अजिंक्य कांचन, अनिल टिळेकर आदींनी अर्ज दाखल केले आहेत.
‘यशवंत’ च्या २१ जागांसाठी आता कोन कसे पॅनेल करते याकडे तालुक्याचे लक्ष आहे. मात्र नुकत्याच झालेल्या हवेली बाजार समितीच्या निवडणूकीनंतर सहा महिन्यांत सत्ताधारी गटात पडलेली फूट व त्यानंतर चव्हाट्यावर येत असलेला कारभार यामुळे यशवंत च्या निवडणुकीत नवीन राजकीय समीकरणे उदयास येणार आहेत. दरम्यान या कारखान्यासाठी २१,०१९ इतकी सभासदांची नावे निश्चित झाली आहेत.