तलवारीचा धाक दाखवून उभा चिरण्याची धमकी, खंडणी मागणार्या गुंडाला लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

उरुळी कांचन : खासगी पाईपलाईन दुरुस्तीचे काम चालू ठेवण्यासाठी ५० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी गुंडांच्या टोळक्याने केली. पैसे दिले नाही तर तलवारीचा धाक दाखवून उभा चिरण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. ही घटना उरळी देवाची गावाचे स्मशानभूमीजवळील ओढ्याजवळ शनिवारी (ता.२६) १ वाजता घडली आहे.
अमोल रत्नाकर वाजे (वय ४०, रा. फुरसुंगी) यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सनी मोहन शेवाळे (वय २५, रा. उरळी देवाची, हवेली) या गुंडाला अटक केली आहे. त्याचे साथीदार प्रसाद भाडळे व आणखी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, सनी शेवाळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुंड आहे. फिर्यादी हे खासगी पाईपलाईन दुरुस्तीचे काम करत होते. सनी शेवाळे हा त्यांच्याकडे आला. तलवारीचा धाक दाखवून फिर्यादी यांना उभा चिरण्याची धमकी दिली. फिर्यादीस पाईपलाईनचे काम चालू ठेवण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली.
तसेच प्रसाद भाडळे व त्याच्या साथीदाराने लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तेथे लोक जमले. सनी शेवाळे याने हातातील तलवार व दांडके हवेल फिरवत आम्ही इथले भाई असून कोणी मध्ये आले तर कोणालाही जिवंत सोडणार नाही, असे बोलून दहशत निर्माण केली. सहायक पोलिस निरीक्षक खैरनार तपास करीत आहेत.