आधी प्रेमाच्या गोड गप्पा, मग धक्कादायक खेळ! माजी विद्यार्थ्याने महिला प्राध्यापिकेसोबत नेमकं काय केलं? ५ लाखांची मागणी अन् व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

नाशिक : सुरुवातीला गोड बोलणं, जुनी ओळख आणि त्यानंतर वाढलेली जवळीक… एका महिला प्राध्यापिकेला या सगळ्यामागे इतका गंभीर प्रकार दडलेला असेल, याची कल्पनाही नव्हती. मात्र, काही दिवसांनी या नात्याचं वेगळंच रुप समोर आलं आणि प्राध्यापिकेला धक्का बसला. माजी विद्यार्थ्यानेच तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून खासगी व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल केल्याचा प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे.
महाविद्यालयात शिक्षण घेत असताना संबंधित प्राध्यापिका आणि चेतन राजाराम ओढे राठोड यांची ओळख झाली होती. पुढे प्राध्यापिकेची दुसऱ्या महाविद्यालयात बदली झाली. त्यानंतर माजी विद्यार्थी चेतनने पुन्हा तिच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला मैत्रीपूर्ण संवाद साधत त्याने जवळीक वाढवली. हळूहळू त्याने प्राध्यापिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे.

यानंतर सोशल मीडिया आणि व्हिडिओ कॉलवर त्यांच्यात संवाद होऊ लागला. याच संवादादरम्यान प्राध्यापिकेचे खासगी अश्लील व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्ड केल्याचा आरोप चेतनवर आहे. काही काळानंतर याच व्हिडिओंचा वापर करून त्याने प्राध्यापिकेला धमकावण्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


नकार देताच समोर आला कथित खरा चेहरा
चेतनने प्राध्यापिकेला तब्बल आठवडाभरासाठी महाराष्ट्राबाहेर सहलीला येण्याचा दबाव टाकल्याचा आरोप आहे. मात्र, प्राध्यापिकेने त्याला नकार दिला. यानंतर परिस्थिती आणखी गंभीर झाली. तिच्याकडील खासगी व्हिडिओ आणि दोघांमधील चॅट्स सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.
इतकंच नाही, तर हे व्हिडिओ आणि चॅट्स सार्वजनिक न करण्याच्या बदल्यात पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यामुळे घाबरलेल्या प्राध्यापिकेने अखेर गंगापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर पोलिसांनी चेतन राजाराम ओढे राठोड याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात माहिती तंत्रज्ञान कायद्यासह अॅट्रॉसिटी कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास गंगापूर पोलीस करत असून, संबंधित व्हिडिओ, चॅट्स आणि डिजिटल पुराव्यांचीही चौकशी केली जात आहे.
या घटनेमुळे सोशल मीडिया आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून खासगी माहिती मिळवून त्याचा गैरवापर करत ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार किती गंभीर ठरू शकतात, हे पुन्हा समोर आले आहे.
