Pune Crime : कर्जाचा हप्ता थकल्याने घरात घुसून मारहाण करुन विनयभंग; एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या अधिकार्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल

पुणे : घेतलेल्या कर्जाचा हप्ता थकल्याने घरात शिरुन दारुच्या नशेत मारहाण करुन महिलेचा विनय भंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फायनान्स बँकेच्या अधिकार्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी भेकराईनगर येथील एका ४८ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ए यु स्मॉल फायनान्स बँकेच्या कॅम्प शाखेचे सुशिल, वहिद पटे, मोहम्मद काशीद रजा, सरल शर्मा, मंगेश अरविंद धामणे, तन्मय जैन, संजी सरहाणी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांनी ए यु स्मॉल फायनान्स बँकेचे कर्ज घेतले होते़ त्याचे हप्ते थकल्याने बँकचे अधिकारी सुशिल याने बँकेचे इतर अधिकारी यांना फिर्यादीचे घरी पाठविले.
त्यांनी दारुचे नशेत फिर्यादीच्या घरात प्रवेश केला. फिर्यादीचे पतीचे अंगावर धावून गेले. फिर्यादी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता वहिद पटे याने फिर्यादीचा हात पकडून विनयभंग केला.
फिर्यादीची सून बेडरुममध्ये लहान बाळाला दुध पाजत असताना तिच्याकडे पाहून सरल शर्मा हिने तू यांच्यासोबत कशाला लग्न केले, याला २ हप्ते भरायला होत नाही.
तु तुझ्या फादरला बोलावून घे, असे म्हणून फिर्यादीचे पती व मुलाला शिवीगाळ करुन घर खाली करण्याची धमकी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक खळदे तपास करीत आहेत.