रात्री पत्नीने जेवण वाढलं, साडेअकराला दरवाजा उघडला; आत आले तिघे अन्…कांड झालं

सांगली : पत्नीच्या आयुष्यातील तब्बल १८ वर्षांचं गुपित पतीला समजल्यानंतर घरातील वाद विकोपाला गेले. याच वादातून पत्नीने कथित प्रियकरासोबत पतीला संपवण्याचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या जत तालुक्यात समोर आला आहे. जेवणातून गुंगीचं औषध देऊन पतीला बेशुद्ध करण्यात आलं आणि त्यानंतर घरात आलेल्या तिघांनी मिळून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, हत्या केल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला. तब्बल दीड महिन्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपासातून या प्रकरणाचा उलगडा झाला.
डफळापूर येथील अप्पासाहेब लक्ष्मण चव्हाण (वय ५२) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी त्यांची पत्नी सुनीता अप्पासाहेब चव्हाण (४०), गंगाधर रामू तेली (५०), विक्रांत सर्जेराव चव्हाण (२३), प्रतीक लक्ष्मण मोकाशी आणि अप्पासाहेबांची अल्पवयीन मुलगी अशा पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, सुनीता आणि गंगाधर तेली यांच्यात गेल्या १८ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या संबंधांची माहिती अप्पासाहेबांना मिळाल्यानंतर त्यांनी पत्नीला जाब विचारण्यास सुरुवात केली. त्यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. अखेर अप्पासाहेब या संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याने त्यांचा काटा काढण्याचा निर्णय सुनीता आणि गंगाधर यांनी घेतल्याचा आरोप आहे. यासाठी गंगाधरने त्याचा मित्र विक्रांतला एक लाख रुपये देण्याचं ठरवलं. त्यानंतर प्रतीक मोकाशी यालाही कटात सहभागी करून घेण्यात आलं.


२२ ऑगस्टच्या रात्री या कटाची अंमलबजावणी करण्यात आली. सुनीताने रात्रीच्या जेवणातून अप्पासाहेबांना गुंगीच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास तिने घराचा दरवाजा उघडून गंगाधर, विक्रांत आणि प्रतीक यांना आत घेतलं. संशय येऊ नये यासाठी घराबाहेरील कुत्र्यालाही पकडून ठेवण्यात आल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे.
घरात प्रवेश केल्यानंतर विक्रांतने अप्पासाहेबांचे हात पकडले, तर प्रतीकने त्यांचे पाय धरले. याचवेळी गंगाधरने उशीने त्यांचं तोंड दाबून आणि हाताने गळा आवळून त्यांची हत्या केल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
हत्या केल्यानंतर प्रकरण दडपण्यासाठी आरोपींनी वेगळीच कहाणी तयार केली. अप्पासाहेबांना हृदयविकाराचा झटका आल्याचं नातेवाईकांना सांगण्यात आलं. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर कपडे, अंथरूण आणि हत्या करताना वापरलेली उशी जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचंही तपासात समोर आलं.
दरम्यान, १ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडून संशयितांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुनीताने फिर्यादीसमोर या घटनेची कबुली दिल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यानंतर जाधव यांनी चौकशी करून खात्री केली आणि ४ ऑक्टोबर रोजी पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यावरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक विजय घेरडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
