नितीन गडकरी यांच्या सूचनेनंतर न्हावरा -केडगाव -चौफुला मार्गासाठी २५० कोटी तातडीने मंजूर ; रस्ताच्या कामाला होणार सुरूवात…!

यवत : राष्ट्रीय महामार्ग (548 DG) न्हावरा – केडगाव – चौफुला या रस्त्याचे रुंदीकरण आणि विस्तारीकरणाचे काम तातडीने हाती घेण्यात यावे यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची आमदार राहुल कुल यांनी नुकतीच दिल्ली येथे भेट घेतली होती. त्यांच्या मागणीनुसार या रस्त्यासाठी सुमारे २५० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता मिळाली असुन सदर कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला प्रत्यक्ष सुरूवात होत आहे.
या रस्त्याच्या कामासंदर्भात आमदार राहुल कुल यांनी नुकतीच कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग, पुणे धनंजय देशपांडे, सहाय्यक अभियंता रुचा बरडकर, सहाय्यक अभियंता आदेश देशपांडे, प्रकल्प व्यवस्थापक अनिल दळवी यांचे समवेत बैठक पार पडली. यावेळी भीमा पाटसचे माजी उपाध्यक्ष आनंद दादा थोरात उपस्थित होते.
या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून गंभीर अपघातांचे प्रमाण देखील वाढत आहे हे लक्षात घेता काम लवकारात लवकर हाती घ्यावे, कामाचा दर्जा राखावा, तसेच काम करताना नागरिकांची गैरसोय होऊ नये या बाबत दक्षता घ्यावी अशा सूचना आमदार राहुल कुल यांनी दिल्या आहेत.