थकबाकी भरण्यास टाळाटाळ! बिअर बनविणार्या कंपनीला ५७ कोटींचा कर बुडविल्याप्रकरणी दणका; दोन संचालकांवर गुन्हा दाखल

पुणे : थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणार्या ब्रुक्राप्ट माइक्रो प्रायव्हेट लिमिटेड या बिअर बनविणार्या व विकणार्या कंपनीला राज्यकर विभागाने तब्बल ५७ कोटी ४८ लाख ६९ हजार ४१५ रूपयांचा कर बुडविल्याप्रकरणी दणका दिला आहे. याप्रकरणी कंपनीच्या दोन संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुकेतु दत्तात्रय तळेकर (रा. वार्डन फ्लंट क्रमांक २०१, बांद्रा) आणि प्रतीक रघुनाथ चतुर्वेदी (रा. शारदा नगर, रायबरेली रोड स्कीम, लखनौ) यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राज्यकर निरीक्षक दिपक साहेबराव शिंदे यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिपक शिंदे हे येरवडा येथील वस्तू व सेवाकर भवन येथे राज्यकर निरीक्षक म्हणून पदावर आहे. कोणत्याही व्यापार्याने कोणतीही मालाची विक्री केली असता त्या व्यापार्याकडे कराची रक्कम वसूल करून ती शासनाच्या तिजोरीमध्ये जमा करायची असते. तर ब्रुकाफ्ट माइक्रो ब्रुइंग ही कंपनी बिअर बनवणे व अन्न व बिअर विकणे अशा प्रकारचा व्यवसाय करते. ही कंपनी मोहंमदवाडी येथील कोरीअंथ बॅक्वेट हॉटेल येथे कार्यरत आहे.
या कंपनीचे संचालक तळेकर आणि चतुर्वेदी यांनी मुल्यवर्धीतकर कायदा २००२ च्या कलम २० अन्वये विवरणपत्रके दाखल बंधनकारक असताना त्यांना वारंवार याबाबत सुचित केले होते. तसेच कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. त्यालाही योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने व तब्बल ५७ कोटी ४८ लाख ६९ हजार ४१५ हजारांचा कर चुकविल्याने कंपनीच्या दोन्ही संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अप्पर राज्यकर आयुक्त धनंजय आखाडे, राज्यकर सहआयुक्त रेश्मा घाणेकर, राज्यकर उपायुक्त सुधीर खेडकर, सहायक राज्यकर आयुक्त निलम भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकर निरीक्षक दिपक शिंदे यांच्या पथकाने केली आहे.