एका रात्रीत 3600 कोंबड्यांचा मृत्यू! पुण्यातील पोल्ट्री फार्ममध्ये गूढ घटना; लाखोंचं नुकसान


पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे पोल्ट्री व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका पोल्ट्री फार्ममधील तब्बल 3600 बॉयलर कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून या घटनेमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

लाखणगाव येथील शेतकरी संतोष पोंदे हे गेली अनेक वर्षे पोल्ट्री व्यवसाय करत आहेत. त्यांच्या शेडमध्ये सुमारे 3700 कोंबड्या होत्या. नेहमीप्रमाणे संध्याकाळी खाद्य टाकण्यासाठी शेडमध्ये गेल्यानंतर त्यांना धक्काच बसला. शेकडो नव्हे तर हजारो कोंबड्या मृत अवस्थेत पडलेल्या दिसल्या. एकूण 3700 पैकी केवळ 100 कोंबड्या जिवंत राहिल्या असून तब्बल 3600 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे अंदाजे 6 ते 7 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोंबड्या दगावल्याने स्थानिक प्रशासन आणि पशुसंवर्धन विभागही सतर्क झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृत कोंबड्यांची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. काही नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्राणी रोग अन्वेषण प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

प्राथमिक माहितीनुसार, उष्णतेचा फटका किंवा शेडमधील तापमानातील अचानक वाढ हे संभाव्य कारण असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र बर्ड फ्लू किंवा इतर संसर्गजन्य रोगाची लक्षणे अद्याप आढळून आलेली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी पुढे येत आहे.

लाखणगाव आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर पोल्ट्री व्यवसाय केला जातो. त्यामुळे एकाच ठिकाणी हजारो कोंबड्यांचा झालेला मृत्यू इतर पोल्ट्री मालकांसाठीही चिंतेचा विषय ठरला आहे. आता सर्वांचे लक्ष प्रयोगशाळेच्या अहवालाकडे लागले असून या गूढ मृत्यूमागील कारण काय, याचा उलगडा होण्याची प्रतीक्षा आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!