मुंबईत 15 दिवस जमावबंदी; दिल्लीत CJP आंदोलनाचा तणाव असतानाच पोलिसांचे स्पष्टीकरण


मुंबई : दिल्लीत सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या आंदोलनामुळे देशभरात चर्चेचे वातावरण असतानाच मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 23 जुलै 2026 रोजी रात्री 12.01 वाजल्यापासून 6 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत हे प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहेत. सार्वजनिक शांतता राखणे आणि संभाव्य कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईत जमावबंदी लागू झाल्यानंतर या निर्णयाचा संबंध थेट दिल्लीतील CJP आंदोलनाशी जोडला जात होता. मात्र, मुंबई पोलिसांनी याबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबईत नव्याने कोणत्याही आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू करण्यात आलेली नाही. मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून दर 15 दिवसांनी अशा प्रकारचे प्रतिबंधात्मक आदेश नियमितपणे जारी केले जातात आणि त्याच प्रक्रियेचा हा भाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या आदेशानुसार मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका, सभा किंवा सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मिरवणुकीमध्ये लाऊडस्पीकर, ध्वनिवर्धक, वाद्यवृंद वापरणे तसेच फटाके फोडण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

मात्र, नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ नये यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. विवाह समारंभ, अंत्ययात्रा, कंपन्या व सहकारी संस्थांच्या वैधानिक बैठका, शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये, न्यायालये, दुकाने, कारखाने, चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे यांचे नियमित कामकाज सुरू राहणार आहे.

दरम्यान, विशेष परिस्थितीत सभा किंवा मिरवणुकीसाठी संबंधित झोनल पोलीस उपायुक्त किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेता येणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे.

दुसरीकडे, दिल्लीत नीट परीक्षा गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून CJPचे आंदोलन सुरू असून सोमवारी आंदोलकांनी संसद भवनाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांची मोठी गर्दी पाहता दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. या पार्श्वभूमीवर मुंबईतील जमावबंदीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, हा आदेश नियमित प्रतिबंधात्मक कारवाईचा भाग असल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!