पनीर नव्हे, विष खाताय! अन्न व औषध प्रशासनाच्या धाडीत धक्कादायक प्रकार; लाखोंचा भेसळयुक्त माल नष्ट


बीड : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधातील कारवाईला वेग आला आहे. विविध जिल्ह्यांत सुरू असलेल्या धाडसत्रात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त अन्नसाठा जप्त करून नष्ट करण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर बीड अन्न व औषध प्रशासनाने शिरूर तालुक्यातील दहीवंडी येथील जय श्रीकृष्ण केक अँड बर्फी उत्पादन केंद्रावर धाड टाकत धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. खवा आणि पनीर अधिक पांढरे व आकर्षक दिसण्यासाठी औद्योगिक वापरातील घातक सॅफोलाइट (सोडियम फॉर्मल्डिहाइड सल्फॉक्सीलेट/रॉन्गालाइट) या रसायनाची भेसळ केल्याचा आरोप आहे.

या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणावर खवा, पनीर, पामतेल, स्पॉटलाईट केमिकल तसेच अन्य भेसळीचे साहित्य जप्त करण्यात आले. संशयित अन्नपदार्थांची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याने आणि ते आरोग्यास घातक ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन लाखो रुपयांचा मिल्क केक, बर्फी आणि इतर मिठाईचा साठा घटनास्थळीच नष्ट करण्यात आला.

अधिकाऱ्यांच्या तपासणीत उत्पादन केंद्रात अस्वच्छ परिस्थितीत अन्नपदार्थ तयार व साठवले जात असल्याचेही आढळून आले. त्यामुळे जप्त केलेला संपूर्ण साठा खोल खड्ड्यात टाकून नष्ट करण्यात आला.

या प्रकरणी संबंधित व्यावसायिक कार्तिक सवाईसिंग राजपुरोहित याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर तिघांना ताब्यात घेण्यात आले असून संबंधित उत्पादन केंद्राचा व्यवसायही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, संबंधित व्यावसायिकाची ‘बिकानेर’ नावाने शिरूरसह इतर ठिकाणी मिठाईची दुकाने असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे राज्यातील मिठाई उत्पादक आणि खाद्यव्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, अन्न व औषध प्रशासनाकडून पुढील काळातही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!