‘होय मुख्यमंत्रीच!’ बारामतीतील फ्लेक्सने पेटवल्या चर्चा; सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार राजकीय एंट्री?

बारामती : बारामतीच्या राजकारणात सध्या एका फ्लेक्सची सर्वाधिक चर्चा रंगली आहे. शहरातील चौकात झळकलेल्या एका बॅनरने केवळ नागरिकांचेच नाही, तर संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. “माननीय सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार… होय मुख्यमंत्रीच!” आणि “महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र तुमच्याकडे पाहतोय” अशा आशयाच्या या फ्लेक्समुळे नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे, जय पवार यांनी नुकतेच माध्यमांसमोर सुनेत्रा पवार यांनी २०२९ नंतर राज्याचं नेतृत्व करावं, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर अवघ्या काही दिवसांत बारामतीत लागलेल्या फ्लेक्समुळे राजकीय चर्चांना आणखी हवा मिळाली आहे. “बारामतीकरांची इच्छा अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची होती. आता वहिनीही मोठ्या ताकदीने काम करत आहेत,” असे जय पवार यांनी म्हटले होते.
या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी आमदारांचे पाठबळ आवश्यक असते, असा टोला लगावला. तर शिवसेना नेते भरत गोगावले यांनी “पोटनिवडणुकीतील यशामुळे अशी स्वप्ने पडू लागली असतील,” अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, बारामतीत झळकलेल्या या फ्लेक्समधून सुनेत्रा पवार यांना भविष्यातील मोठं नेतृत्व म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सुरू आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवे राजकीय संकेत दिले जात आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

अधिकृत पातळीवर या फ्लेक्सबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नसली तरी सोशल मीडियावर मात्र या बॅनरची जोरदार चर्चा रंगली आहे. बारामतीतून सुरू झालेली ही चर्चा आता राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण करते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.