बीडमध्ये आमदार सुरेश धस यांच्या जवळच्या कार्यकर्त्याकडून एकाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच केला मोठा खुलासा…

बीड : गेल्या काही दिवसांपूर्वी बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. यामुळे बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला. यानंतर या जिल्ह्यात अनेक धक्कादायक कारनामे समोर आले. अजूनही बीडमधील गुन्हेगारीचे सत्र संपता संपत नसल्याचे चित्र समोर येत आहे. त्यातच आता बीडच्या शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला मारहाण झाल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

कुख्यात गुंड आणि भाजप पदाधिकारी असलेल्या सतीश भोसले याने एका व्यक्तीला बेदम मारहाण केली होती. सतीश भोसले हा आमदार सुरेश धस यांच्या जवळचा असल्याची माहिती समोर येत होती. या प्रकरणानंतर अखेर सतीश भोसले यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मारहाण केल्याचे कबूल केले असून, मित्राच्या पत्नीची छेडछाड झाल्यामुळे हे कृत्य केले असे सांगितले आहे. सतीश भोसले याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना घडलेल्या संपूर्ण प्रकरणाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी भाष्य केले आहे. याबाबत आमदार सुरेश धस यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

याबाबत भोसले म्हणाले, त्या व्यक्तीने माझ्या मित्राच्या बायकोची छेड काढली, म्हणून मी मारहाण केली, मला पोलिसांत जायला हवं होतं. मात्र ती वेळ नव्हती. मला राग आला होता, म्हणून मारहाण केली. कुठल्याही मुली आणि महिलांची छेड काढल्यावर मी शांत बसणार नाही. मला जे योग्य वाटलं ते मी केले, असे सतीश भोसले म्हणाले.

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक पांढरा शर्ट परिधान केलेला व्यक्ती दिसत आहे. या व्यक्तीला एक जण बॅटने मारहाण करताना दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला काही व्यक्ती उभ्या असल्याचे दिसत आहेत. त्यादेखील त्याला मारहाण करत आहेत. त्या व्यक्तीला अत्यंत क्रूरपणे मारहाण केली जात आहे.
याबाबत सुरेश धस म्हणाले जरी हा व्यक्ती माझ्या जवळचा असला तरी त्याच्यावर कारवाई करावी. याबाबत सुरेश धस यांच्यावर देखील टीका होऊ लागली आहे. याबाबत पोलिस तपास करत असून बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली आहे. यामुळे वातावरण तापले आहे.