महिला दिन विशेष: सरकार महिलांसाठी राबवते ‘या’ विशेष योजना, असा घ्या लाभ, होईल फायदाच फायदा…

Womens Day 2025 : दरवर्षी ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या हक्कांचे रक्षण, त्यांच्या उपलब्धींचा सन्मान आणि महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी समर्पित आहे. समाजातील प्रत्येक स्तरावर महिलांनी स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.

महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी भारत सरकार विविध योजना राबवत आहे. या योजना महिलांना सक्षम बनवण्याच्या दिशेने महत्त्वाची भूमिका बजावतात. चला जाणून घेऊया, सध्या कोणत्या योजना उपलब्ध आहेत.
प्रधानमंत्री मातृवंदना योजना…
ही योजना २०१७ मध्ये सुरू करण्यात आली असून, गरोदर महिलांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने राबवली जाते. पहिल्यांदा आई होणाऱ्या महिलांना एकूण पाच हजार रुपयांची मदत तीन टप्प्यांत दिली जाते. पहिल्या तीन महिन्यांत नोंदणी केल्यावर 1000 रुपये, प्रसूतीपूर्व तपासणी पूर्ण झाल्यावर २००० रुपये आणि बाळाच्या पहिल्या लसीकरणानंतर २००० रुपये थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेचा उद्देश गरोदर महिलांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्याचा आहे.

सुकन्या समृद्धी योजना…
ही दीर्घकालीन बचत योजना मुलींच्या शिक्षण आणि विवाहासाठी आर्थिक मदत करण्यासाठी २०१५ मध्ये सुरू करण्यात आली. बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेअंतर्गत या योजनेची अंमलबजावणी होते. पालक किंवा पालक असलेल्या व्यक्तीला मुलीच्या नावाने बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडण्याची संधी मिळते. या योजनेमुळे मुलींचे भवितव्य सुरक्षित करण्यास मदत होते.
बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना..
२०१५ साली सुरू झालेली ही योजना भारतातील मुलींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी महत्त्वाची आहे. या योजनेचा उद्देश मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, स्त्री भ्रूणहत्या रोखणे आणि महिलांना स्वावलंबी बनविणे हा आहे. समाजात मुलींना समान संधी मिळाव्यात आणि त्यांचे भविष्य सुरक्षित व्हावे, यासाठी केंद्र सरकारकडून ही योजना प्रभावीपणे राबवली जाते.
उज्ज्वला योजना..
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०१६ मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेद्वारे गरीब कुटुंबातील महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन दिले जाते. स्वयंपाक करताना महिलांना होणारा त्रास आणि धुरामुळे उद्भवणारे आजार टाळण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. यामुळे स्वच्छ इंधनाचा वापर वाढवून महिलांचे आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.