सकाळ- संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या महिलांनो आता सावधान!! पुण्यात घडल्या धक्कादायक घटना, चोरटे ठेवत आहेत पाळत…

पुणे : चोरीच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात मॉर्निंग वॉकला आलेल्या महिलांना चोरट्यांनी लुबाडल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. एका ठिकाणी मंगळसूत्र लंपास केले, तर दुसऱ्या ठिकाणी गळ्यातील चैन हिसकावली आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी जात असलेल्या महिलांनो सावधान राहा असे सांगण्यात आले आहे.

कर्वेनगरमध्ये घडलेल्या घटनेचे सी सी टिव्ही फुटेज समोर आलेय. पहाटेच्या वेळेचा फायदा घेत पाळत ठेवून दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने मंगळसूत्र हिसकावले. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ६.४२ वाजता ही घटना घडली. ज्येष्ठ महिला असल्यामुळे त्यांना पाठलाग करणे पण शक्य नव्हते.
नवसह्याद्री सोसायटीतील चंदन पथ येथे सकाळी फिरायला जाणार्या जेष्ठ महिलांचे मंगळसूत्र चोरून नेले. हिसकवताना अर्धा भाग तुटून खाली पडला. चोरटा परत मागे आला व पडलेला भाग उचलून नेला. ना कोणाचे भय ना कोणती सुरक्षा अशी चिंता याठिकाणी व्यक्त होत आहे.

दरम्यान, दुसरी घटना कोथरूडमध्ये घडली. सोसायटीमध्ये जात चोरट्यांनी महिलेची सोन्याची चैन हिसकावली. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोथरूड भागातील डी पी रस्त्यावर असलेल्या नचिकेत सोसायटी मध्ये ही घटना घडली. एक दाम्पत्य सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास शतपावली करून घरी परतत होते.

त्यांनी सोसायटीमध्ये प्रवेश केला आणि घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या २ जणांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकवली. पतीने त्यांना पकडायचा प्रयत्न केला मात्र दुचाकीवर असल्यामुळे चोरट्यांनी तिथून पळ काढला. दरम्यान, याबाबत पोलिसात त्यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.