‘विश्वास नांगरे पाटलांचा पीए बोलतोय’ म्हणत पुण्यातील महिला डॉक्टरला ३ लाखांचा गंडा; अश्लील मेसेज अन् अटकेची धमकी देत केली फसवणूक


पुणे : सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जात आहे. आता वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा गैरवापर करून पुण्यातील एका महिला डॉक्टरची तब्बल ३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित डॉक्टरने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

२२ ते २७ ऑक्टोबरदरम्यान हा प्रकार घडला. पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी तो सिंहगड रोड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात महिला डॉक्टरला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण ‘सायबर सेल ऑफ इंडिया’मधून चौधरी बोलत असल्याचे आणि विश्वास नांगरे पाटील यांचा सहाय्यक असल्याचे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरून फोन करून समोरील व्यक्तीने आपण मुंबई क्राईम ब्रँचचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवले.

तुमचे आधार कार्ड एका संशयास्पद मोबाईल क्रमांकाशी जोडले गेले आहे. तसेच, तुमच्या नावाचा वापर अवैध जाहिरातबाजी, अश्लील संदेश, मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिंगसारख्या प्रकरणांमध्ये होत असल्याचा दावा आरोपींनी केला. अटकेची भीती दाखवत त्यांनी महिला डॉक्टरला एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. घाबरलेल्या डॉक्टरने आरोपींनी दिलेल्या खात्यावर ३ लाख रुपये पाठवले.

यापूर्वीही नांगरे पाटील यांच्या नावाचा वापर

विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा आणि प्रतिमेचा वापर करून फसवणूक करण्याचा हा पहिलाच प्रकार नाही. यापूर्वीही त्यांच्या फोटोचा आणि आवाजाची नक्कल करून व्हिडीओ कॉलद्वारे डिजिटल अरेस्टची भीती दाखवत एका व्यक्तीची १ कोटी ४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणात सायबर पोलिसांनी कानपूर आणि इंदूर येथे कारवाई करून दोन आरोपींना अटक केली होती.

विश्वास नांगरे पाटील हे १९९७ च्या बॅचचे महाराष्ट्र केडरमधील वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते नागपूर शहर पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान त्यांनी दाखवलेल्या शौर्यामुळे ते देशभरात परिचित झाले.

यापूर्वी त्यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक शहर पोलीस आयुक्त आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक अशा विविध पदांवर काम केले आहे. ते लेखक आणि वक्ते म्हणूनही परिचित असून, ‘मन में है विश्वास’ आणि ‘कर हर मैदान फतेह’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!