दहावीचा निकाल काही तासांवर असताना विद्यार्थ्याने घेतला टोकाचा निर्णय; कुटुंबावर दु:खाचा डोंगर, कुठे घडली घटना?


छत्रपती संभाजीनगर : राज्यात दहावीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. निकालाच्या भीतीतून एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सोहम ज्ञानेश्वर मोरे असे मृत १७ वर्षीय विद्यार्थ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोहम हा पुंडलिक नगर परिसरात कुटुंबासह राहत होता. दहावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर होण्यापूर्वी तो तणावाखाली होता. आपण परीक्षेत पास होणार नाही, अशी भीती त्याला सतावत असल्याची माहिती समोर आली आहे.

घरात कोणी नसताना सोहमने टोकाचं पाऊल उचलत गळफास घेतला. निकाल जाहीर होण्याच्या काही तास आधीच त्याने आत्महत्या केल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात निकालाच्या तणावातून ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

या घटनेमुळे विद्यार्थ्यांवरील परीक्षेच्या तणावाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. निकालाच्या काळात अनेक विद्यार्थी मानसिक दबावाखाली असू शकतात. त्यामुळे पालकांनी मुलांशी संवाद साधून त्यांना भावनिक आधार देणे आणि निकालापेक्षा मानसिक आरोग्य अधिक महत्त्वाचे असल्याची जाणीव करून देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!