राज्यातील मंत्रिमंडळात वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार? ‘या’ बड्या नेत्याचं पुनरागमन होणार, एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर चर्चांना उधाण…

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळातील खांदेपालटाविषयी जोरदार चर्चा सुरु आहेत. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे वारंवार ‘सेल्फ गोल’ करत असल्याने त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे.

त्यांच्या सततच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे, तसेच शेतकरी वर्गातून वाढत्या नाराजीमुळे त्यांना मंत्रिपदावरून दूर करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांची नावे चर्चेत असतानाच, आता एक वाईल्ड कार्ड एन्ट्री घडण्याची दाट शक्यता आहे. ती म्हणजे शिंदे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच पुनरागमन होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांची पुण्यातील घरी भेट घेतल्याचे फोटो समोर आल्यानंतर राजकीय चर्चांना प्रचंड वेग आला आहे. या भेटीचे अधिकृत कारण ‘आरोग्याची विचारपूस’ असे सांगण्यात आले असले, तरी राजकीय वर्तुळात यामागे काहीतरी वेगळे शिजत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

दरम्यान, गेल्या नऊ महिन्यांपासून मंत्रीपदापासून दूर असलेले आणि नाराज असलेले तानाजी सावंत आता पुन्हा मंत्रिमंडळात परतणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांच्या समर्थकांमध्येही या चर्चेमुळे उत्साहाचे वातावरण आहे.

तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्यास, कोणत्या विद्यमान मंत्र्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाणार यावरही चर्चेला उधाण आले आहे. सध्या कृषी खाते असलेल्या माणिकराव कोकाटे, तसेच संजय शिरसाट यांचे मंत्रिपद संकटात असल्याचे वृत्त आहे.