दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? अखेर शरद पवारांच्या बैठकीत मोठा निर्णय; चर्चांना पूर्णविराम…


मुंबई : अजित पवार गट आणि शरद पवार गट पुन्हा एकत्र येणार का? या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीत मोठा निर्णय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आज शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. बैठकीदरम्यान दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांनी विलिनीकरणाबाबत पक्षाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी बैठकीत केली होती. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होणार नसल्याचं स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विलिनीकरणाच्या चर्चांवर आता पडदा पडल्याचं मानलं जात आहे. विशेष म्हणजे, या बैठकीला शरद पवार स्वतः उपस्थित होते. सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी त्यांच्या उपस्थितीतच ही भूमिका मांडण्यात आल्याने तेही या निर्णयाशी सहमत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, काही पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांनी स्वतः याबाबत स्पष्ट भूमिका मांडायला हवी होती, अशी अपेक्षाही व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!