लाडकी बहीण योजना बंद होणार का? अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

मात्र आता या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच इतर खात्याचा निधी देखील लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात येत असल्याचा देखील आरोप होत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर आता अमृता फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सरकारी तिजोरीवर आर्थिक ताण तर आहेच, पण ही योजना बंद होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे, त्या पुण्यात बोलत होत्या.

अमृता फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवर प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे. राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण तर आहेच, मात्र लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकार आर्थिक ताण सहन करायला तयार आहे, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सध्या दोन्ही ठाकरे बंधुंच्या युतीसंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे, यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन भाऊ एकत्र आलेले आहेत ही चांगली गोष्ट आहे, कोणताही अजेंडा असो किंवा नसो दोन भाऊ एकत्र येणे हे कुटुंबासाठी चांगली गोष्ट आहे, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.