कॉकरोच जनता पार्टी निवडणूक लढवणार? अभिजीत दीपकेंनी जे काय ठरलय ते स्पष्टच सांगून टाकलं


छत्रपती संभाजीनगर : देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या कॉकरोच जनता पार्टी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, या प्रश्नावर अखेर पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. गेल्या काही महिन्यांत CJP ने विविध आंदोलनांमुळे राष्ट्रीय स्तरावर मोठी चर्चा निर्माण केली आहे.

विशेषतः शिक्षणाशी संबंधित प्रश्नांवर झालेल्या आंदोलनानंतर पक्षाकडे देशभराचे लक्ष वेधले गेले. अशा परिस्थितीत CJP राजकीय पक्ष म्हणून निवडणुका लढवणार का, याबाबत उत्सुकता वाढली होती.

याच पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या निवासस्थानी अभिजीत दीपके यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. पक्षाची पुढील रणनीती, आगामी आंदोलनांची दिशा आणि संघटन विस्तार यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. बैठकीपूर्वी माध्यमांशी बोलताना त्यांनी निवडणुकीबाबतची भूमिका स्पष्ट केली.

आम्हाला सध्या राजकीय पक्ष व्हायचं नाही

निवडणूक लढवण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर अभिजीत दीपके म्हणाले, “मला असं वाटतं की प्रसारमाध्यमांनाच आम्ही राजकीय पक्ष बनावं अशी जास्त उत्सुकता आहे. पण सध्या आमची तशी कोणतीही भूमिका नाही. आम्हाला ही सामाजिक चळवळच कायम ठेवायची आहे. देशात आधीच अनेक राजकीय पक्ष आहेत. आणखी एक पक्ष तयार करून काय साध्य होणार?”

त्यांनी स्पष्ट केलं की, CJP चा उद्देश सत्ता मिळवण्यापेक्षा लोकांचे प्रश्न मांडणे आणि त्यासाठी संघर्ष करणे हा आहे.

राजकारणावर लोकांचा विश्वास उडाल्याची टीका

देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना दीपके यांनी राजकीय पक्षांवर निशाणा साधला. “लोकांचा राजकारणावरील विश्वास दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. सकाळी जनता एका पक्षाला मतदान करते आणि संध्याकाळी सरकार दुसऱ्याच पक्षाचं बनतं. निवडून आलेले आमदार-खासदार काही वेळातच पक्ष बदलतात. त्यामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास ढासळत आहे,” असे ते म्हणाले.

सोशल मीडियातून सुरू झालेली चळवळ देशभर चर्चेत

कॉकरोच जनता पार्टीची सुरुवात सोशल मीडिया, विशेषतः इन्स्टाग्रामवरील मोहिमेतून झाली होती. त्यानंतर विविध सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत पक्षाने अनेक आंदोलने केली. त्यामुळे अल्पावधीतच CJP देशभर चर्चेत आली असून, युवकांमध्ये या चळवळीला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, आजच्या बैठकीत CJP च्या पुढील आंदोलनांची दिशा, संघटन विस्तार आणि भविष्यातील कार्यक्रमांबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अभिजीत दीपके यांच्या वक्तव्यानंतर सध्या तरी CJP निवडणूक लढवण्याच्या तयारीत नसून सामाजिक चळवळ म्हणूनच काम सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!