शरद पवार पक्षाचे आमदार फुटणार का? राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अनुपस्थितीवर सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य


मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांच्या पक्षांतरानंतर आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.

पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, देशात लोकशाही शिल्लक राहिली आहे का, असा प्रश्न आता पडू लागला आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना दोन-अडीच वर्षेही पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत पक्षफोडीचे प्रकार सुरू होतात. 2029 मध्ये निवडणुका असताना एवढी घाई कशासाठी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“एखाद्या महत्त्वाच्या विधेयकासाठी विरोधकांनी सरकारला पाठिंबा देणे ही लोकशाहीतील सामान्य बाब आहे. जीएसटीसारख्या विधेयकावेळी काँग्रेसने भाजपला सहकार्य केले होते. त्यासाठी पक्ष फोडण्याची गरज नव्हती,” असेही त्या म्हणाल्या.

विरोधी पक्षांच्या अस्तित्वावरही त्यांनी चिंता व्यक्त केली. “सगळेच सत्तेत गेले तर सामान्य जनतेचे प्रश्न मांडणार कोण?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

महाविकास आघाडीच्या बैठकीला 13 आमदार अनुपस्थित होते का? या प्रश्नावर सुद्धा सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं. “आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी आधीच आगाऊ कळवलं होतं. बाकी माहिती तुम्हाला मुंबईत बंटी दादा, शिंदे साहेब देतील” शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे एकूण 10 आमदार आहेत.

दरम्यान, शालेय अभ्यासक्रमात आणीबाणीचा धडा समाविष्ट करण्याच्या निर्णयावरही सुप्रिया सुळे यांनी टीका केली. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सातत्याने एनसीईआरटीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत.

नव्या पिढीवर विशिष्ट विचारधारा लादण्याचा प्रयत्न देशाच्या ऐक्यासाठी घातक ठरू शकतो, असे त्या म्हणाल्या. तसेच सहकार क्षेत्रात राजकारण आणू नये, अशी भूमिका मांडताना त्यांनी विविध पक्षांचे प्रतिनिधी एकत्र काम करत असल्याची उदाहरणेही दिली.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!