महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे निर्देश..

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. राज्यातील सर्व विभागांनी समन्वयाने, नियोजनबद्ध आणि वेगाने काम करत जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्यावे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
याशिवाय, पानी फाउंडेशनसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या जलसंधारणविषयक कामांना प्रशासकीय यंत्रणेने सक्रिय सहकार्य करावे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे काम करून या मोहिमेला गती द्यावी, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

यंदा राज्यात वॉटर कप अभियान लवकर सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी जलसंधारणविषयक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनाला विविध सूचना दिल्या.


जलसंधारणासाठी एकात्मिक कार्ययोजना तयार करा
दुष्काळाच्या आव्हानावर मात करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रित प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यापूर्वी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी विभागातील अधिकारी आणि क्षेत्रीय यंत्रणेने विविध सरकारी कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत उत्तम नेतृत्व आणि कार्यक्षमता दाखवली आहे.
अडचणीच्या काळात प्रशासकीय यंत्रणा उत्साहाने आणि जबाबदारीने कामाला लागल्यास कामाचा वेग वाढतो, हे यापूर्वी अनुभवायला मिळालं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेपासून काम सुरू असल्याचं चित्रही यापूर्वी दिसलं आहे. आता त्याच कार्यतत्परतेने आणि समर्पित भावनेने जलसंधारणाच्या कामांसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर दीर्घकालीन उपाय शोधण्यासाठी जलसंधारणाची कामं प्रभावीपणे राबवण्यावर सरकारचा भर असून, या मोहिमेत प्रशासकीय यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थांनी समन्वयाने काम करावं, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.
