मोठी बातमी! ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार लाखोंची रक्कम? कृषीमंत्री भरणेंचं मोठं वक्तव्य

मुंबई : शेतकरी कर्जमाफीबाबत राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू होणाऱ्या आचारसंहितेमुळे कर्जमाफीची प्रक्रिया रखडणार का? अशी चर्चा सुरू असतानाच कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी मोठं स्पष्टीकरण दिलं आहे.

काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. पात्र शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. मात्र आता विधानपरिषद निवडणुकीमुळे लागू होणाऱ्या आचारसंहितेचा या प्रक्रियेवर परिणाम होणार का? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीचा निकाल २२ जून रोजी लागणार असून संपूर्ण प्रक्रिया २५ जूनपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जमाफीची अंमलबजावणी उशिरा होईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

यावर कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, शेतकरी कर्जमाफीसाठी कोणतीही अडचण येणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य निर्णय घेतील. थकबाकीदार शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल. ही रक्कम ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असेही त्यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे थकबाकीदारांसोबतच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विधानपरिषद निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून होत असल्याने सर्वसामान्य मतदार या निवडणुकीत मतदान करत नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी मतदानाचा हक्क बजावतात. त्यामुळे आचारसंहितेचा कर्जमाफी प्रक्रियेवर किती परिणाम होईल, याबाबत संभ्रम होता.
मात्र कृषीमंत्री दत्ता भरणे यांच्या वक्तव्यानंतर शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून आता सरकार ३० जूनपूर्वी कर्जमाफीची अंमलबजावणी कशी करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.