भारतात पेट्रोल-डिझेल कमी पडणार का? मोदींच्या आवाहनानंतर मोठी माहिती समोर..


जगभरात वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतींनी पुन्हा उसळी घेतली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधनाचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे. पेट्रोल आणि डिझेलचा अनावश्यक वापर टाळून परकीय चलनाची बचत करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे की देशात पेट्रोल, डिझेल, एलपीजी किंवा कच्च्या तेलाची कोणतीही कमतरता नाही. भारताची इंधन पुरवठा व्यवस्था पूर्णपणे सुरक्षित असून नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, असे सरकारने सांगितले आहे.

आंतर-मंत्रालयीन गटाच्या (IGoM) बैठकीत अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की भारताकडे सुमारे 60 दिवसांचा कच्च्या तेलाचा साठा, 60 दिवसांचा नैसर्गिक वायूचा साठा आणि 45 दिवसांचा एलपीजी साठा उपलब्ध आहे. तसेच परकीय चलन साठा 7.3 अब्ज डॉलर्सच्या मजबूत स्थितीत असल्याचेही सांगण्यात आले.

सरकारी माहितीनुसार, पश्चिम आशियातील संघर्षाचा काही प्रमाणात जागतिक पुरवठ्यावर परिणाम होत असला तरी भारताने वेळेवर उपाययोजना केल्यामुळे देशांतर्गत पुरवठा स्थिर आहे. त्यामुळे इंधन टंचाईचा कोणताही धोका सध्या नाही.

भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल शुद्धीकरण करणारा देश असून 150 हून अधिक देशांना पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात करतो. देशांतर्गत मागणी पूर्ण करण्याबरोबरच भारत जागतिक बाजारातही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे आर्थिक दबाव निर्माण होऊ शकतो.

पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना इंधन बचतीचे महत्त्व समजावून सांगताना मेट्रो, सार्वजनिक वाहतूक आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा अधिक वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच शक्य असेल तिथे वर्क फ्रॉम होमसारखे उपाय वापरण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी स्पष्ट केले की भारताकडे मोठ्या तेल विहिरी नसल्यामुळे जागतिक संकटाचा परिणाम थेट देशावर होतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने इंधन बचतीत सहभाग घेणे आवश्यक आहे.

सरकारने पुन्हा एकदा आश्वासन दिले आहे की देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, मात्र भविष्यातील आर्थिक स्थैर्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने इंधनाचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!