बारामतीत पुन्हा ‘पवार विरुद्ध पवार’ची रंगणार लढत? युगेंद्र पवारांचं सूचक वक्तव्य; विलिनीकरणावरही पडदा


बारामती : बारामतीच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘पवार विरुद्ध पवार’ या चर्चेने जोर धरला आहे. अजून विधानसभा निवडणुकीला तीन वर्षांचा कालावधी बाकी असला, तरी बारामतीतून नेमकं कोण मैदानात उतरणार, यावरून राजकीय वातावरण तापू लागलं आहे. अजित पवारांचे पुत्र जय पवार यांच्या विधानानंतर आता युगेंद्र पवार यांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे चर्चांना आणखी खतपाणी मिळालं आहे. “पवार विरुद्ध पवार होईलच याची काय खात्री?” या एका वाक्याने त्यांनी बारामतीतील आगामी राजकीय समीकरणांबाबत मोठे संकेत दिले आहेत.

मुंबईतील वाय. बी. सेंटर येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत नुकतीच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी लवकरात लवकर नियुक्त्या पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती युगेंद्र पवार यांनी दिली. त्यानंतर बारामतीत माध्यमांशी बोलताना त्यांनी आगामी निवडणुका, पक्षातील भूमिका आणि विलीनीकरणाच्या चर्चांवर स्पष्ट भाष्य केलं.

२०२९ च्या बारामती विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांची इच्छा काय आहे, असा प्रश्न विचारला असता युगेंद्र पवार म्हणाले, “अजून तीन वर्षांचा कालावधी बाकी आहे. एका वर्षात खूप काही बदलू शकतं. २०२८ मध्ये हा प्रश्न विचारा, तेव्हा स्पष्ट बोलेन.” त्यांच्या या उत्तरामुळे बारामतीत पुन्हा एकदा पवार कुटुंबातील अंतर्गत राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, पक्षात कोणतंही मोठं पद न मिळाल्याबाबतही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “ज्यांचे डिपॉझिट जप्त झाले, त्यांनाही मोठी पदं मिळाली. मला पद मिळालं नाही, पण तेच माझ्यासाठी फायद्याचं ठरलं. त्यामुळे मला लोकांमध्ये राहता आलं, बारामतीकरांसाठी वेळ देता आला,” असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे पक्षातील नियुक्त्यांवर नाराजीही व्यक्त केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांवरही त्यांनी थेट भूमिका घेतली. “आता विलीनीकरण होणार नाही. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे. कार्यकर्त्यांपर्यंत तो संदेश पोहोचवणं गरजेचं आहे,” असं सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार हालचाली सुरू असतानाच बारामतीतील पुढील राजकीय वारसदार कोण, याबाबतची उत्सुकता पुन्हा वाढू लागली आहे. जय पवार, युगेंद्र पवार आणि विद्यमान राजकीय समीकरणांमुळे आगामी काळात बारामतीचं राजकारण आणखी रंगणार, हे मात्र निश्चित मानलं जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!