‘KYC अपडेट करा’ असा मेसेज आला अन् मोठा घात झाला; लिंक क्लिक करताच पुणेकराच्या खात्यातून लाखो गायब


पुणे : तुमच्या मोबाईलवर बँक किंवा KYC अपडेटसंदर्भातील मेसेज येत असतील तर सावध राहा. कारण अशाच एका बनावट मेसेजच्या माध्यमातून पुण्यातील एका नागरिकाची तब्बल 2 लाख 75 हजार 500 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

सायबर भामट्यांनी KYC अपडेट करण्याच्या बहाण्याने एक बनावट लिंक पाठवली. त्या लिंकवर क्लिक करताच संबंधित व्यक्तीचा मोबाईल हॅक करण्यात आला आणि बँक खात्यांवर ताबा मिळवत लाखो रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 23 डिसेंबर 2025 ते 25 फेब्रुवारी 2026 या कालावधीत घडली. पीडित व्यक्तीच्या मोबाईलवर KYC अपडेट न केल्यास बँक सेवा बंद होईल, असा भीती निर्माण करणारा मेसेज पाठवण्यात आला होता. त्यासोबत एक लिंक देण्यात आली होती.

विश्वास ठेवून तक्रारदाराने लिंकवर क्लिक केली. त्यानंतर सायबर चोरांनी मोबाईलचा ताबा घेत बँक खात्यांची माहिती मिळवली. तसेच क्रेडिट कार्डचा गैरवापर करत वेगवेगळ्या खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने एकूण 2 लाख 75 हजार 500 रुपये ट्रान्सफर केले.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी संबंधित मोबाईल क्रमांक, सिमकार्डधारक तसेच ज्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवण्यात आले आहेत, त्या खातेदारांचा शोध सुरू केला आहे. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये आणि बँक किंवा KYC संदर्भातील माहिती देताना काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!