सांगलीत सहा स्वीकृत सदस्यांची निवड; पुणे जिल्हा परिषदेत सात जागांसाठी कोणाला मिळणार संधी?


उरुळीकांचन : जिल्हा परिषदांच्या राजकारणात स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा विषय सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. सांगली जिल्हा परिषदेत सहा स्वीकृत सदस्यांची निवड जाहीर झाल्यानंतर आता पुणे जिल्हा परिषदेतील नियुक्ती प्रक्रियेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

पुणे जिल्हा परिषदेत सात स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पाच, भाजपला एक आणि शिवसेनेला एक जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पाच जागांवर कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता वाढली आहे.

सांगलीत सहा स्वीकृत सदस्यांची निवड

सांगली जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्यपदाच्या सहा जागांसाठी सहाच अर्ज दाखल झाल्याने सहाही उमेदवारांची निवड झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संतोष घनवट आणि सतीश पवार, काँग्रेसचे विठ्ठल साळुंखे, भाजपच्या धनश्री लाड, शिवसेना शिंदे गटाच्या ॲड. विद्या मोटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हर्षवर्धन देशमुख यांचा समावेश आहे.

सांगलीतील निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता पुणे जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्यांची नियुक्ती कधी होणार, याकडे इच्छुकांसह राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीच्या पाच जागांसाठी मोठी चुरस

पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ७३ पैकी ५१ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे संभाव्य पक्षीय गणितानुसार सात स्वीकृत सदस्यांपैकी पाच जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. या जागांसाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील अनुभवी पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची चर्चा होऊ शकते.

या नियुक्त्यांबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे. पक्षासाठी केलेले काम, संघटनात्मक योगदान, सामाजिक प्रतिनिधित्व आणि तालुकानिहाय समतोल या निकषांचा विचार केला जाण्याची शक्यता आहे. निवडणुकीत संधी न मिळालेल्या तसेच राजकीय पातळीवर मागे राहिलेल्या अनुभवी कार्यकर्त्यांनाही या नियुक्त्यांकडून अपेक्षा आहेत.

शिरुर-हवेलीत कोणाला संधी?

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघात उमेदवारांचा कोट्यावधींचा खर्च झाला आहे. खर्चाची आकडेवारी १० ते १५ कोटींच्या घरात राहिली आहे. अशातच पक्षासाठी खर्च करुनही पराभूत झालेल्या उमेदवारांना संधी मिळावी अशी मागणी आहे. मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांत प्रदिप वसंत कंद, रेखा बांदल, आण्णा महाडीक यांची नावे चर्चेत असून संभाव्य इच्छुकांत कोणाला संधी मिळणार म्हणून मतदारसंघाचे लक्ष लागून आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!