भारतात नवीन शिक्षण पद्धत लागू होणार? पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संकेत, नेमकं काय म्हणाले?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिरावर धर्मध्वजाचे आरोहण करण्यात आले. ध्वजपताका आकाशात डौलात फडकली. राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधानांनी एका महत्त्वाच्या विषयाला हात घातला.

अनेक दिवसांपासून देशातील अभ्यासक्रमातील बदलांची नांदी आपण पाहत आहोत. आता शिक्षण पद्धतीच बदलण्यात येणार का? याची चर्चा पंतप्रधानांच्या आजच्या भाषणानंतर सुरू झाली आहे. लॉर्ड मॅकाले यांच्या शिक्षण पद्धतीवर टीका करत त्यांनी भारताला “मानसिक गुलामीतून मुक्त करण्याचे” आवाहन केले.

तसेच समारंभादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, २०३५ मध्ये मॅकालेच्या शिक्षण पद्धतीला २०० वर्षे पूर्ण होणार आहेत. येत्या दहा वर्षांत भारताला मानसिक गुलामीतून मुक्त करण्याचे ध्येय आपण ठेवले पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, मॅकालेच्या शिक्षण पद्धतीने भारतीयांच्या मनात कमीपणाची भावना निर्माण केली. भारत स्वतंत्र झाला, संविधान लिहिले गेले, परंतु विदेशी गोष्टी सर्वोत्तम आणि भारतीय गोष्टी कमी दर्जाच्या असा विचार जनमानसात रुजला, ही शोकांतिका आहे. त्यांनी दावा केला की भारतीय संस्कृती, विचार आणि लोकशाहीशक्तीला जाणूनबुजून इतिहासातून दूर ठेवण्यात आले.
मोदी यांनी भारतीय नौदलाच्या ध्वजातील बदलाची आठवण करून दिली. पूर्वीचा ध्वज ब्रिटिश प्रतीकांवर आधारित होता, पण आता तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्वजप्रेरणेवर आधारित आहे. ही केवळ डिझाइनची नाही तर मानसिक परिवर्तनाची प्रक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
