बायको नांदायला येईना, वाद विकोपाला गेला अन्…, पुण्यात घडली थरारक घटना

पुणे : कौटुंबिक वादातून पत्नीच्या गळ्यावर चाकूने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हि धक्कादायक घटना विमानतळ परिसरातील खांदवेनगर येथे रविवारी (ता. २७) दुपारी घडली आहे.

प्रेम चव्हाण (वय. २८) असे मृत महिलेचे नाव असून, पोलिसांनी आरोपी पती प्रेम चव्हाण याला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, ममता काही दिवसांपासून पतीपासून लांब राहत होती आणि माहेरी जाण्याऐवजी खांदवेनगरमधील आपल्या मावशी रेश्मा रामेश्वर जाधव यांच्याकडे राहत होती. ममता आणि प्रेम यांच्यात सतत कौटुंबिक कारणावरून वाद होत असत.

रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रेम चव्हाण अचानक मावशीच्या घरी आला. त्याने ममताशी बोलण्याचा बहाणा करून वाद घातला. वाद विकोपाला गेल्यानंतर त्याने जवळच्या चाकूने ममताच्या गळ्यावर वार केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ममताचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर प्रेम चव्हाण तेथून पसार झाला. माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि काही तासांत प्रेम चव्हाणला अटक केली. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे