शरद पवारांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुन्हा रुग्णालयात का नेलं? प्रकृतीबाबत समोर आली महत्त्वाची माहिती

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते पुण्याहून मुंबईत आले. मात्र, मुंबईत आल्यानंतर पुन्हा तपासणीसाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. त्यांना कोणताही गंभीर त्रास नसून नियमित वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रोहित पवार यांनी दिली प्रकृतीबाबत माहिती

आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. दर चार ते पाच महिन्यांनी शरद पवार यांची नियमित तपासणी केली जाते. बाहेर दौऱ्यावर असताना त्यांना व्हायरल इन्फेक्शन झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत.

मुंबईत आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या चाचण्या करून घ्याव्यात, अशी सुप्रिया सुळे आणि कुटुंबीयांची इच्छा होती. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
शरद पवारांचे सर्व दौरे रद्द
दरम्यान, प्रकृतीच्या कारणास्तव शरद पवार यांचे नियोजित सर्व दौरे रद्द करण्यात आल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि शेतकरी तसेच शेतमजुरांच्या प्रश्नांसाठी शरद पवार दौरे करत होते. मात्र, प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना दौरा रद्द करावा लागला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपण स्वतः मैदानात उतरलो असल्याचेही रोहित पवार यांनी सांगितले. काल आपण नाशिक आणि बुलढाणा येथे होतो. आज अकोला येथे असून सायंकाळी अमरावतीमध्ये जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
शरद पवारांना नेमका काय त्रास?
शरद पवार यांना कफ आणि संसर्गाचा त्रास जाणवत होता. तसेच थकवाही जाणवत असल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे दोन दिवस उपचार केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते मुंबईत आले. मात्र, पुन्हा तपासणीची गरज असल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
