पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल झाला का? जाणून घ्या आजचे नवीन भाव एका क्लिकवर..

पुणे : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांनी त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शनिवार (13 जून) रोजी देशातील तेल विपणन कंपन्यांनी इंधनाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याने आगामी काळात पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत होती. मध्य-पूर्वेतील तणाव आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे इंधनाचे दर मे 2022 नंतरच्या उच्चांकावर पोहोचले होते. मात्र आता जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत मिळत आहेत.
अमेरिका आणि इराण यांच्यात तात्पुरत्या शांतता कराराची शक्यता निर्माण झाल्याने जागतिक तेल बाजाराला दिलासा मिळाला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या असून ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल 87 डॉलरच्या आसपास आले आहेत. गेल्या आठवड्यातच कच्च्या तेलाच्या किंमतीत लक्षणीय घसरण नोंदवण्यात आली आहे.

भारत आपल्या इंधन गरजांसाठी मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा थेट परिणाम देशांतर्गत दरांवर होतो. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीतील घसरण कायम राहिल्यास येत्या काही महिन्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगत नागरिकांना दिलासा दिला आहे. तसेच पुरवठा सुरळीत राहावा यासाठी सरकारने पर्यायी स्रोतांमधून कच्च्या तेलाची उपलब्धता सुनिश्चित केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
एकूणच, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागण्याची चिन्हे दिसत असून वाहनधारकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.