‘मला का सोडून गेलास?’ केतनच्या मृत्यूनंतर सिया गोयलची भावनिक पोस्ट आता पुन्हा चर्चेत

पुणे : व्यावसायिक केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात धक्कादायक घडामोडी समोर येत असतानाच आता त्यांच्या होणाऱ्या पत्नी सिया गोयलची एक जुनी सोशल मीडिया पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. केतन यांच्या मृत्यूनंतर भावनिक शब्दांत व्यक्त केलेलं दुःख आणि त्यानंतर झालेली अटक यामुळे या पोस्टकडे नव्याने पाहिलं जात आहे.

लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान केतन अग्रवाल यांचा सुमारे 400 फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचं मानलं जात होतं. मात्र पोलिसांच्या तपासात या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं. तपासादरम्यान समोर आलेल्या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी सिया गोयल आणि तिच्या मित्राला ताब्यात घेतलं आहे.
या कारवाईनंतर सियाची एक जुनी इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. केतन यांच्या मृत्यूनंतर आणि स्वतःच्या वाढदिवशी सियाने त्यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत अत्यंत भावनिक संदेश लिहिला होता.

“तू मला वाढदिवशी एकटं का सोडून गेलास? आपण लग्नाच्या इतके जवळ आलो असताना हे का घडलं?” अशा आशयाच्या पोस्टमुळे अनेकांनी त्यावेळी तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती. मात्र आता तपासात समोर आलेल्या घडामोडींनंतर हीच पोस्ट पुन्हा चर्चेत आली आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून विविध तांत्रिक पुरावे आणि संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात आहे.