संसदेत विरोधकांचा गोंधळ सुरू असतानाच मोदी सरकारचा मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 32,701 कोटी रुपयांच्या दोन मोठ्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर या निर्णयांची माहिती दिली.

यामध्ये 23,731 कोटी रुपयांच्या गोबरधन योजनेचा आणि आसाममध्ये 8,970 कोटी रुपये खर्चून 135.87 किलोमीटर लांबीच्या चार-लेन राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाचा समावेश आहे.

गोबरधन योजनेत मोठे बदल

गोबरधन योजना सहा प्रमुख स्तंभांवर आधारित असणार आहे. यामध्ये उत्पादनाची हमीशीर खरेदी, स्थिर किंमत, भांडवली सहाय्य, पाइपलाइन पायाभूत सुविधा, कर्ज हमी आणि नवकल्पनांसाठी चॅलेंज फंड यांचा समावेश आहे.

प्रत्येक बायोगॅस प्रकल्पाला सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन नेटवर्क किंवा ट्रंक पाइपलाइनशी जोडण्यात येणार आहे. एमएसएमई आधारित प्रकल्पांना 85 टक्क्यांपर्यंत कर्ज हमी तसेच भांडवली अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

CBG उत्पादनात दहापट वाढीचे लक्ष्य

पुढील दहा वर्षांत कंप्रेस्ड बायोगॅसच्या उत्पादनात दहापट वाढ करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. यामुळे ऊर्जा आयातीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार असून, मोठ्या प्रमाणात परकीय चलनाची बचत होण्याचा अंदाज आहे. तसेच रोजगारनिर्मिती, कार्बन उत्सर्जनात घट आणि सेंद्रिय खताच्या उत्पादनालाही चालना मिळणार आहे.

आसाममध्ये 135.87 किमीचा चार-लेन महामार्ग

केंद्रीय मंत्रिमंडळाने आसाममधील राष्ट्रीय महामार्ग-15 वर बायहाटा चारियाली ते मिशन चारियाली दरम्यान 135.87 किलोमीटरच्या चार-लेन महामार्गाला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प 8,970 कोटी रुपयांच्या खर्चाने BOT (टोल) मॉडेलवर विकसित केला जाणार आहे.

या महामार्गामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेशातील प्रमुख आर्थिक केंद्रांमधील दळणवळण अधिक मजबूत होणार आहे. पाच बायपासमुळे वाहतूक कोंडी कमी होण्यासही मदत होईल.

गुवाहाटी-तेजपूर प्रवासाचा वेळ कमी होणार

नव्या महामार्गामुळे गुवाहाटी ते तेजपूर प्रवासाचा कालावधी सुमारे साडेतीन तासांवरून 1.7 तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मालवाहतूक आणि प्रादेशिक आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!