महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पार्थ पवारांचा गेम नेमकं कोणी केला? फडणवीसांचे नाव येतंय पुढे, चंद्रकांत पाटील म्हणाले…

पुणे : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील ४० एकर जमीन खरेदी प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार चांगलेच अडचणीत आले आहेत. या जमीन व्यवहारात गैरव्यवहार उघडकीस आल्यामुळे तो रद्द झाला आहे.

तसेच १८०० कोटी मूल्य असलेली जमीन ३०० कोटी रुपयांत विकत घेतली, तसेच स्टँप ड्युटी म्हणून अवघे ५०० रुपये भरले असे आरोप पार्थ पवार यांच्या वर होत असून त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे.

दरम्यान, आगामी निवडणुका नजरेसमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना दणका देण्यासाठी पार्थ पवारांचे जमीन प्रकरण बाहेर काढले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही खेळी खेळली. असा कयास माध्यमांनी बांधला आहे. प्रत्यक्षात असं अजिबात नसल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. रुटीनमध्ये हे प्रकरण समोर आलं आहे. महापालिका निवडणुकांशी या प्रकरणाचा अजिबात संबंध नाही, असं मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले आहे.

याबाबत माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, सुर्याला जे दिसत नाही ते पत्रकाराला दिसतं, त्यामुळे तुम्ही पत्रकारांनी कालपासून हा एक आपला अंदाज मार्केटमध्ये टाकला आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत धक्का देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी खेळली मोठी खेळी पण, असं काही नाहीये, रूटीनमध्ये एखादा विषय समोर येतो आणि त्याची पण चौकशी व्हायची बाकी आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्याच भ्रष्टाचाराला सहन करत नाहीत, त्यांनी तातडीने तहसीलदाराला निलंबित केलं आहे.
मोठे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.फौजदारी दावा कोणाकोणावर करायचा त्याबाबत यादी झाली आहे, त्या वेगाने तपास पुढे चालला आहे. त्यामुळे आपण आत्ताच पार्थ पवारांची जबाबदारी आहे की, त्यांच्या कंपनीची आहे. हे सगळं चौकशीअंती बाहेर येईल, त्या सगळ्याचा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या काहीही कसलाही संबंध नाही. असे ते म्हणाले.
