रिक्षेत तिघे बसले होते, पोलिसांनी झडती घेताच धक्कादायक प्रकार उघड! पुण्यात एमडीचा साठा जप्त; ७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पुणे : मार्केटयार्ड परिसरात एका रिक्षात बसलेल्या तिघांच्या संशयास्पद हालचालींनी पोलिसांचे लक्ष वेधले आणि त्यानंतर झालेल्या तपासणीत अंमली पदार्थांचा साठाच समोर आला. पुणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथक क्रमांक दोनने केलेल्या या कारवाईत २४.६३ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, अंमली पदार्थांसह रिक्षा, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ७ लाख ५ हजार ४२९ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ नोव्हेंबर रोजी पोलीस निरीक्षक जीवन माने, सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण आणि त्यांचे पथक मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांवर लक्ष ठेवून असताना गुलटेकडी परिसरातील वारणा सहकारी बँकेच्या इमारतीजवळ पोलिसांना एक काळ्या-पिवळ्या रंगाची बजाज रिक्षा दिसली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर, उत्सव समिती चौकातून गंगाधामकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभ्या असलेल्या या रिक्षात तिघे संशयास्पदरीत्या बसले होते.


पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तिघांना ताब्यात घेतले. पंचांच्या उपस्थितीत त्यांची अंगझडती घेतली असता २४.६३ ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन आढळून आले. या अंमली पदार्थाची किंमत ४ लाख ९२ हजार ६०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय ६० हजार रुपये किमतीचा मोबाईल, १ लाख ५० हजार रुपये किमतीची बजाज रिक्षा आणि २ हजार ८२९ रुपये रोख रक्कमही जप्त करण्यात आली. या सर्व मुद्देमालाची एकत्रित किंमत ७ लाख ५ हजार ४२९ रुपये आहे.

या कारवाईत सुभाषगौडा गुरन्ना चौधरी (वय ३२), बाप्पू भिमा बाळशंकर (वय २८) आणि शाहरुख मेहबूब खान (वय २८, तिघेही रा. मार्केटयार्ड, पुणे) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जप्त केलेला अंमली पदार्थ कुठून आणला होता, त्याची विक्री कोणाला केली जाणार होती आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, या दिशेने तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन माने, सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण यांच्यासह पोलीस अंमलदार अमोल जगताप, सतीश चव्हाण, शरद धांडे, संदीप देवकाते, योगेश मांढरे, योगेश कुंभार, सुरेखा साबळे, जानवी सूर्यवंशी, सुकेशिनी आंबले आणि अजिंक्य जोजारे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. अंमली पदार्थविरोधी पथक क्रमांक दोन आणि गुन्हे शाखा, पुणे शहर यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही कारवाई पार पडली.
