खरी शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टात आज निर्णायक सुनावणी; काय होणार निकालाचा मार्ग?


मुंबई : चार वर्षांपूर्वी शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर सुरू असलेल्या कायदेशीर लढाईला आता निर्णायक वळण मिळत आहे. निवडणूक आयोगाने अधिकृत शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात नियमित सुनावणी सुरू असून काल ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला.

सिब्बल यांनी न्यायालयात मांडणी करताना, “विधिमंडळ पक्ष हा मूळ राजकीय पक्ष नसून त्याचा एक भाग आहे. केवळ आमदारांच्या संख्येच्या आधारावर पक्षाची ओळख ठरवता येत नाही. तसेच पक्षाच्या घटनेची वैधता ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही,” असा दावा केला.

यावर सरन्यायाधीशांनी सिब्बल यांना काही महत्त्वाचे प्रश्न विचारले. “कलम 11-अ जानेवारी 2013 मध्ये निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले होते का? तसेच त्या कागदपत्रावरील स्वाक्षरीची पुष्टी करता येईल का?” अशी विचारणा न्यायालयाने केली.

या प्रकरणाची पुढील सुनावणी आज दुपारी 2 वाजता होणार आहे. ठाकरे गटाच्या वतीने पुन्हा कपिल सिब्बल युक्तिवाद करतील. त्यानंतर ठाकरे गटाचे आणखी एक वकील बाजू मांडतील. त्यानंतर शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी/मेहता आणि कौल न्यायालयात प्रत्युत्तर देणार आहेत.

दरम्यान, काल सुनावणीनंतर न्यायालयाबाहेर संजय राऊत यांनी ‘व्हिक्टरी’ चिन्ह दाखवले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना राहुल शेवाळे म्हणाले, “दावा कोणीही करू शकतो, मात्र अंतिम निर्णय देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाचाच आहे.”

आता आजच्या सुनावणीत शिंदे गट काय भूमिका मांडतो आणि न्यायालय कोणती दिशा देते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!