“अजितदादांच्या शेवटच्या प्रवासाचे फुटेज नेमकं कुठे अडकलं? पोलिसांकडे उपलब्ध, पण जनतेला देण्यास नकार; वकिलांच्या दाव्याने नवा प्रश्न!”


बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांमध्ये आता आणखी एका मुद्द्याची भर पडली आहे. अपघाताच्या दिवशी अजितदादा देवगिरी बंगल्यातून मुंबई विमानतळापर्यंत कसे पोहोचले, याचे सीसीटीव्ही चित्रण मिळावे म्हणून बारामतीतील अ‍ॅड. नितीन यादव यांनी माहिती अधिकारांतर्गत अर्ज केला होता. मात्र, मुंबई पोलीस आणि नागरी विमान सुरक्षा विभागाने फुटेज देण्यास नकार दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.

२८ जानेवारी २०२६ रोजी मुंबई विमानतळावरील पहाटे ६ ते सकाळी ९ या वेळेतील सीसीटीव्ही चित्रण यादव यांनी केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतूक विभागाकडे मागितले होते. मात्र, त्यांची मागणी मान्य करण्यात आली नाही. त्यानंतर अजित पवार यांच्या शासकीय देवगिरी निवासस्थानापासून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतच्या प्रवासाचे फुटेजही त्यांनी माहिती अधिकारात मागवले.

हे चित्रण राज्याच्या गृह विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने मुंबई पोलिसांकडे अर्ज करण्यात आला होता. मात्र, संबंधित माहिती सार्वजनिक कामकाजाशी किंवा सार्वजनिक हिताशी संबंधित नसल्याचे कारण देत पोलिसांनी फुटेज देण्यास नकार दिल्याचे यादव यांनी सांगितले. व्यक्तीच्या खासगी माहितीमध्ये हस्तक्षेप होऊ शकतो, असाही आक्षेप घेण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे.

फुटेज पोलिसांकडे दिलंय, मग नागरिकांना का नाही?

नागरी विमान सुरक्षा विभागाच्या निर्णयाविरोधात यादव यांनी प्रथम अपील केले होते. त्यावर सीसीटीव्ही चित्रण सर्वसामान्य नागरिकांना देता येणार नसल्याचे, तसेच ते पोलिसांना दिल्याचे उत्तर मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे. म्हणजेच फुटेज उपलब्ध असून ते तपास यंत्रणांकडे दिल्याचे सांगितले जात असताना ते सार्वजनिक करण्यास नकार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधी होते. त्यामुळे त्यांच्या शेवटच्या प्रवासाशी संबंधित माहिती खासगी असल्याचे कारण देऊन रोखणे योग्य नसल्याचे यादव यांचे म्हणणे आहे. अपघातामागे घातपात नसेल, तर केंद्र आणि राज्य सरकारने उपलब्ध असलेले सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करून जनतेच्या मनातील शंका दूर कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही अलीकडेच पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा पुन्हा रंगली आहे. अ‍ॅड. नितीन यादव यांनी केलेल्या दाव्यांवर मुंबई पोलीस, नागरी विमान सुरक्षा विभाग आणि राज्य सरकार काय भूमिका मांडतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!