जळगाव जिल्हा बँकेत महायुतीचा ‘मास्टरस्ट्रोक’! अखेरच्या क्षणी भाजप कार्यकर्त्याची माघार; गिरीश महाजनांसह गुलाबराव पाटील बिनविरोध विजयी

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी झालेल्या माघारींनी संपूर्ण राजकीय समीकरणच बदलले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी भाजप कार्यकर्ते तुकाराम विठोबा निकम यांनी माघार घेत मंत्री गिरीश महाजन यांना पाठिंबा दिला. त्यामुळे महाजन यांची बिनविरोध निवड झाली. दुसरीकडे, मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधातील उमेदवारांनीही अर्ज मागे घेतल्याने त्यांचाही विजय निश्चित झाला आहे. महायुतीतील नेत्यांच्या समन्वयामुळे जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठी घडामोड घडली आहे.
जामनेर मतदारसंघातून गिरीश महाजन यांच्यासह रघुनाथ पाटील आणि तुकाराम विठोबा निकम यांनी उमेदवारी दाखल केली होती. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रघुनाथ पाटील यांचा अर्ज बाद ठरवला. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी त्यांनी नाशिक येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात हरकत दाखल केली; पण तेथेही त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे महाजन यांच्याविरोधात उरलेल्या निकम यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी अर्ज मागे घेत आपण गिरीश भाऊंच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले. परिणामी महाजन यांचा बिनविरोध विजय झाला.


गुलाबराव पाटील यांच्या निवडणुकीतही असाच राजकीय पेच निर्माण झाला होता. जळगाव तालुका विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून त्यांच्याविरोधात भाजपच्या माजी महापौर जयश्री महाजन, शिवसेनेचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील आणि भाजपचे प्रभाकर सोनवणे यांनी अर्ज भरले होते. मात्र, महायुतीचा युतीधर्म पाळण्यासाठी भाजपच्या उमेदवारांनी माघार घ्यावी, अशा सूचना गिरीश महाजन यांनी दिल्याचे सांगितले जाते. त्यानुसार जयश्री महाजन आणि प्रभाकर सोनवणे यांनी अर्ज मागे घेतले. गुलाबराव पाटील यांच्याविरोधातील तिन्ही उमेदवारांनी माघार घेतल्याने त्यांचीही बिनविरोध निवड झाली.

दरम्यान, जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने एकत्रित भूमिका घेतल्याचे दिसत आहे. महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवण्याची भूमिका गिरीश महाजन यांनी यापूर्वीच मांडली होती. आता महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयश्री पाटील यांचीही बिनविरोध निवड झाल्याने जिल्हा बँकेतील सत्तेच्या लढाईला वेगळे वळण मिळाले आहे. या घडामोडींनंतर जिल्हा बँकेच्या पुढील सत्तासमीकरणांकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

