रेशनकार्डधारकांनो सावधान! वर्षाला ६० हजारांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर होणार तपासणी; पिंपरी-चिंचवडमधील ६ हजार लाभार्थी रडारवर

पिंपरी : स्वस्त धान्याचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उत्पन्नाच्या ठरवलेल्या मर्यादेत न बसताही सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून धान्य घेणाऱ्या लाभार्थ्यांची अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात सुमारे सहा हजार लाभार्थी उत्पन्नाच्या निकषात बसत नसल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे. मात्र, या लाभार्थ्यांना अद्याप योजनेतून वगळण्यात आलेले नाही. त्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गैरप्रकार रोखून गरजू कुटुंबांपर्यंत शासकीय धान्य पोहोचवण्यासाठी राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने ‘मिशन सुधार’ अभियान हाती घेतले आहे. या मोहिमेत शिधापत्रिकांची माहिती तपासली जात असून, ई-केवायसीच्या आधारे लाभार्थ्यांची पात्रता पडताळली जात आहे. आतापर्यंतच्या प्रक्रियेत सुमारे दोन हजार शिधापत्रिका तपासणीच्या कक्षेत आल्याची माहिती आहे. पात्रता नसलेल्या लाभार्थ्यांना अन्नसुरक्षा योजनेतून अन्य प्रवर्गात वर्ग करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील पात्र कुटुंबांना स्वस्त धान्य मिळण्याची संधी निर्माण होऊ शकते.


चिंचवड (अ), पिंपरी (ज) आणि भोसरी (फ) या तीन परिमंडळांमध्ये अंत्योदय तसेच प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकांची तपासणी सुरू आहे. वार्षिक उत्पन्न ६० हजार रुपयांपेक्षा अधिक असलेली कुटुंबे, आयकर भरणारे कुटुंबीय आणि शासनाने निश्चित केलेल्या पात्रता निकषांत न बसणाऱ्या लाभार्थ्यांची माहिती तपासली जात आहे.

याशिवाय सलग तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ स्वस्त धान्य न उचलणाऱ्या शिधापत्रिकाधारकांचीही चौकशी केली जात आहे. संबंधित कुटुंबांशी संपर्क साधून धान्य न घेण्यामागचे कारण जाणून घेतले जाणार आहे. संपर्क होऊ न शकल्यास नियमांनुसार शिधापत्रिका तात्पुरती बंद करण्याची कारवाई होऊ शकते.

दरम्यान, या तपासणीबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. कोणत्याही पात्र कुटुंबावर अन्याय होऊ नये, याची दक्षता घेऊनच प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे पुण्याचे अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे तपासणीनंतर कोणत्या लाभार्थ्यांची पात्रता कायम राहते आणि कोणाला अन्य प्रवर्गात वर्ग केले जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.
