देवाभाऊच्या मेवाखाऊ सरकारला कधी जाग येणार? मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कसलीच मदत नाही….

मुंबई : राज्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी बेहाल झाला असून राज्यात ओला दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात निर्णय होईल, ही अपेक्षा होती. परंतु आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतदेखील निराशाच हाती पडली.

जाती-जातीत, धर्मा-धर्मात भांडणे लावून मूळ समस्यांपासून पळ काढता येईल हा जर सरकारचा समज असेल तर इथला शेतकरी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
देवाभाऊच्या मेवाखाऊ सरकारला कधी जाग येणार? असेही ते म्हणाले. सध्या पडणाऱ्या जोरदार पावसामुळं माझ्या मतदारसंघात कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यात पिकांचं, शेतीचं आणि लोकांच्या घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन सरसकट मदत जाहीर करण्याची मागणी प्रशासनाकडं केली. याबाबत अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांना पत्र दिलं. तसंच यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळं जिल्ह्याला राज्य शासनाकडून मिळालेल्या आर्थिक मदतीचंही तातडीने वाटप करण्याची मागणी केली.

अपेक्षा आहे की, सध्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने होतील आणि मदतही लवकरात लवकर मिळेल, असेही आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. सध्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून मदतीची मागणी केली जात आहे. यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत.