पुण्यात नेमकं चाललंय काय? डोक्याला बंदूक लावली अन् आईसमोर तरुणीला उचललं, घटनेने शहर हादरलं…

पुणे : पुण्यात अपहरणाची एक घटना उघडकीस आली आहे. पीडितेचं पुण्यातून अपहरण झाल्यानंतर मुंबईतून तिची सुटका करण्यात आली आहे. या घटनेचा तपास सहकारनगर पोलीस करत आहेत. या घटनेने मात्र पुन्हा शहर हादरून गेले आहेत.

याबाबत माहिती अशी की, धनकवडी परिसरातून १६ वर्षीय तरुणीचं एकतर्फी प्रेमातून अपहरण करण्यात आलं होतं. गुरुवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास पीडित तरुणी आपल्या आईसोबत रस्त्याने चालत जात होती. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तरुणीसह तिच्या आईला अडवलं. यावेळी त्या दोघी मोठ्या प्रमाणावर घाबरल्या होत्या.
यावेळी आरोपीने खिशातून बंदूकसदृश्य वस्तू काढत तरुणीच्या डोक्याला लावले. यामुळे आई देखील घाबरली. नंतर तरुणीला जबरदस्तीने गाडीवर बसवून तिचं अपहरण केलं. नंतर आईनं तातडीनं घटनेची माहिती सहकारनगर पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

आरोपी पीडितेला घेऊन मुंबईच्या दिशेनं गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पुणे पोलीस मुंबईच्या दिशेने रवाना झाले. पोलीस खालापूरला गेले आणि तरुणीची सुटका केली. पण आरोपी फरार झाले. पोलिसांनी यश कातुर्डे या तरुणासह त्याच्या मित्रावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
प्रकरणातील एक आरोपी पीडितेच्या ओळखीचा असल्याची माहिती आहेत. यातील एकाचे पीडितेवर एकतर्फी प्रेम होतं. यातून रागातून ही घटना घडली आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत. आईच्या समोर तरुणीचं अशाप्रकारे अपहरण झाल्याने पुणे शहरात खळबळ उडाली आहे.