आज गणेशचतुर्थीला महाराष्ट्रात कसं असेल हवामान? मुंबई-पुण्यासह ‘या’ भागांत पावसाचा अंदाज

पुणे : मागील काही दिवसांपासून गायब झालेला पाऊस काल अचानक परतला. गणेशोत्सवाला सुरुवात होण्याच्या एक दिवस आधी आलेल्या पावसामुळे मुंबापुरीतील गणेशभक्तांचे हाल झाले. बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू असताना अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांच्या उत्साहावर काहीसे विरजण पडले.
जुलै महिन्यात मुसळधार पाऊस कोसळला. त्यानंतर मात्र पावसाने ओढ दिली. श्रावण महिन्यात पावसाची एखादी-दुसरी सर येऊन जायची. मात्र, काल बाप्पाच्या आगमनाच्या एक दिवस आधी पावसाने सकाळपासूनच जोर धरला होता.

त्यामुळे खरेदीसाठी बाहेर पडलेल्या गणेशभक्तांचे हाल झाले. पावसाचे कालचे रूप पाहून आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे—गणपतीचे दहा दिवस पाऊस असाच कोसळणार का? हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो? जाणून घ्या.


आज, 14 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसाला सुरुवात झाली आहे. आजही राज्यातील काही भागांत पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई आणि पुण्यात ढगांची दाटी राहणार असून पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज आहे.
त्यामुळे आजही सर्वांचे डोळे आभाळाकडे असतील. पावसाने पुन्हा हजेरी लावणे ही बळीराजासाठी चांगली बाब आहे. मात्र, शहरांमध्ये पावसामुळे गणेशोत्सवाच्या उत्साहावर काहीसा परिणाम होण्याची शक्यता आहे.
मुंबईत कसं असेल हवामान?
मुंबईत 14 सप्टेंबर रोजी आकाशात ढगांची दाटी राहणार असून पावसाची शक्यता आहे. IMDच्या ताज्या अपडेटनुसार मुंबईत हलका पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी शहर आणि उपनगरांमध्ये अधूनमधून पाऊस कोसळत राहण्याचा अंदाज आहे.
पुण्यात कसं असेल हवामान?
पुण्यात आज, 14 सप्टेंबर रोजी ढगांची दाटी राहणार आहे. हलका पाऊस कोसळू शकतो. तापमान 23 ते 29 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. पुण्यातील काही भागांत IMDने मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे.
नागपुरात कसं असेल हवामान?
नागपुरात 14 सप्टेंबर रोजी दुपारी आणि संध्याकाळच्या वेळी पावसाची शक्यता आहे. IMDने विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. नागपुरातील तापमान 23 ते 30 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये कसं असेल हवामान?
नाशिकच्या आकाशात आज पावसाचे ढग राहणार असून मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळू शकतो. साताऱ्यातही पावसाची शक्यता आहे. अकोल्यातही पाऊस होण्याचा अंदाज असून IMDने हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे.