पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी वाढवली चिंता; ९० दिवसांत धक्कादायक आकडे समोर


पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहराची प्रतिमा आता वाढत्या गुन्हेगारीमुळे धोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांनी शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पोलीस दलाच्या आकडेवारीनुसार, २०२५ पासून पुण्यात महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २०२५ मध्ये बलात्काराचे एकूण २१९ गुन्हे नोंदवले गेले होते. तर २०२६ च्या केवळ पहिल्या तीन महिन्यांत म्हणजे जानेवारी ते मार्चदरम्यानच ५० गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यानुसार सरासरी दररोज एका गंभीर गुन्ह्याची नोंद होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

विनयभंगाच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याचे समोर आले आहे. २०२५ मध्ये अशा २९७ घटना नोंदवण्यात आल्या होत्या. तर २०२६ च्या पहिल्या ९० दिवसांतच ६६ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि निवासी परिसरातही महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढू लागली आहे.

महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमागे अनेक कारणे पुढे येत आहेत. बहुतांश प्रकरणांमध्ये आरोपी हे पीडितेच्या ओळखीतील व्यक्ती, मित्र किंवा नातेवाईक असल्याचे समोर आले आहे.

लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवून ब्लॅकमेलिंग आणि अत्याचाराच्या घटना घडत असल्याचे पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे. याशिवाय अमली पदार्थांचे वाढते व्यसन आणि गुन्हेगारी प्रवृत्ती यामुळेही परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे मानले जात आहे.

महिलांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिसांकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. दामिनी पथकाच्या माध्यमातून गस्त वाढवण्यात आली असून भरोसा सेलद्वारे समुपदेशन केले जात आहे. तसेच रात्रीच्या वेळी महिलांच्या सुरक्षेसाठी ‘कॉप विथ यू’सारखे उपक्रमही सुरू करण्यात आले आहेत.

मात्र, शहराचा झपाट्याने वाढणारा विस्तार, आयटी क्षेत्रामुळे वाढलेली लोकसंख्या आणि तुलनेने अपुरे पोलीस बळ यामुळे प्रत्येक भागावर प्रभावी नियंत्रण ठेवणे मोठे आव्हान ठरत आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर उपाययोजना आणि गुन्हेगारांवर कायद्याचा प्रभावी धाक निर्माण करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!