एकनाथ शिंदेंच्या मनात चाललंय काय?, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडे फिरवली पाठ…

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. याच पार्शभूमीवर हायुतीमध्ये सत्ता वाटपाच्या मुद्यावर सुरू असलेले नाराजीनाट्य अजूनही सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
त्यानंतर बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीकडे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठ फिरवली. ही बैठक नगरविकास विभागाशी संबंधित होती. या बैठकीला खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांच्या विकास प्राधीकरणाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे होणार होती. त्याशिवाय, नाशिक महापालिका सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाबाबतही बैठक होती. या बैठका नगरविकास खात्याशी संबंधित होत्या, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी बैठकीला हजेरी लावली नाही.
उद्योग खात्यातील अनेक निर्णय प्रशासकीय पातळीवर परस्पर घेतले जात असल्याने मंत्री उदय सामंत यांनी खात्याचे प्रधान सचिव आणि ‘एमआयडीसी’च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. तर, एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी आयएएस अधिकाऱ्याची वर्णी लावण्यात आली.
खासगी स्वीय सचिव, ओएसडीच्या नियुक्तींवरही मुख्यमंत्री कार्यालयाकडून अंकुश ठेवला जात असल्याने शिवसेनेच्या मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तर, याआधी एक मंत्रिमंडळ बैठक तसेच १०० दिवसांच्या आढावाच्या बैठकीलाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या बैैठकीत शिंदे हजर न राहिल्याने चर्चांना उधाण आले आहे.