पुण्यात पेट्रोल पंपावर पाणीमिश्रित इंधन? पेट्रोल भरताच गाड्या बंद; वाहनचालकांमध्ये खळबळ


पुणे : देशभरात इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरून सुरू असलेल्या चर्चेदरम्यान आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजगुरुनगर येथील एका पेट्रोल पंपावर पाणीमिश्रित पेट्रोल मिळत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, यामुळे वाहनचालकांसह पेट्रोल पंप चालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, इथेनॉलमध्ये पाणी शोषून घेण्याचा गुणधर्म असल्याने पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. अनेक पेट्रोल पंपांवरील भूमिगत साठवण टाक्या E20 (20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल) साठवण्यासाठी आवश्यक त्या तांत्रिक निकषांनुसार तयार नसल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे इंधनात पाण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता, भूमिगत टाक्यांमध्ये झिरपणारे पाणी किंवा टँकरमधून येणाऱ्या इंधनात मिसळलेले पाणी यामुळे E20 इंधनात पाण्याचे प्रमाण वाढू शकते. जर हे प्रमाण 0.5 टक्क्यांपेक्षा अधिक झाले, तर इथेनॉल पाण्यासोबत मिसळून टाकीच्या तळाशी साचते, तर पेट्रोल वरच्या थरात राहते.

यामुळे टाकीच्या तळातून इंधन खेचणाऱ्या डिस्पेन्सरमधून काही वाहनांमध्ये पाणी आणि इथेनॉलचे मिश्रण जाण्याची शक्यता असल्याचा दावा काही तज्ज्ञ आणि पेट्रोल पंप चालकांकडून करण्यात आला आहे. यामुळे वाहनांच्या इंजिनवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पुण्यातील राजगुरुनगर परिसरात पाणीमिश्रित पेट्रोल भरल्यानंतर अनेक वाहने बंद पडल्याचा दावा करण्यात आला आहे. काही वाहनचालकांनी बाटलीत घेतलेल्या पेट्रोलमध्ये पाण्याचा थर स्पष्ट दिसत असल्याचे सांगितले असून, यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मात्र, या प्रकरणाबाबत संबंधित तेल कंपनी किंवा शासकीय यंत्रणेकडून अद्याप अधिकृत दुजोरा किंवा सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे समोर आलेले दावे आणि व्हायरल व्हिडिओ यांची अधिकृत चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!