अजितदादांच्या विमान अपघातामागे कारखान्याचा धूर? भाजपच्या आरोपांनी खळबळ; रोहित पवारांच्या अडचणी वाढणार?


मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे गूढ अद्याप कायम असतानाच आता या प्रकरणात एक नवा राजकीय आरोप समोर आला आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि व्हीएसआर कंपनीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आमदार रोहित पवार यांनाच भाजपने लक्ष्य केले आहे. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी थेट रोहित पवार यांच्या साखर कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुराचा मुद्दा उपस्थित केला आहे. या धुरामुळे बारामती विमानतळ परिसरातील दृश्यमानता कमी झाली होती का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.

रोहित पवारांचे आरोप नेमके काय?

रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार विमान अपघात प्रकरणात अद्याप प्रथम माहिती अहवाल दाखल न झाल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले. व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंग यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय फडणवीस यांच्यावर ‘मफलर मॅन’ असा उल्लेख करत निशाणाही साधला.

भाजपने थेट कारखान्याचा मुद्दा उपस्थित केला!

रोहित पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना नवनाथ बन यांनी इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथील बारामती ॲग्रो साखर कारखान्याकडे लक्ष वेधले. त्यांच्या माहितीनुसार, हा कारखाना बारामती विमानतळापासून हवाई अंतराने सुमारे ६.३ किलोमीटर, तर रस्त्याने जवळपास १७ किलोमीटर अंतरावर आहे.

बन यांनी केलेल्या दाव्यानुसार, फेब्रुवारी महिन्यातील कमी तापमान आणि कारखान्यातून बाहेर पडणारा धूर यामुळे परिसरात धुक्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, विमान अपघाताच्या दिवशी सकाळी पावणेनऊच्या सुमारास धुरामुळे विमानतळ परिसरातील दृश्यमानता कमी झाली होती, असा दावाही त्यांनी केला.

६ मार्चच्या पत्रकार परिषदेचाही उल्लेख

या संदर्भात ६ मार्च २०२६ रोजी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी वैभव सोलणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन चौकशीची मागणी केली होती, असे बन यांनी सांगितले. रोहित पवार किंवा त्यांच्या साखर कारखान्याचा या दुर्घटनेशी अथवा घातपाताशी काही संबंध आहे का, याची तपास यंत्रणांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मात्र, कारखान्याच्या धुरामुळे दृश्यमानता कमी झाली होती किंवा त्याचा विमान अपघाताशी संबंध होता, हे अद्याप सिद्ध झालेले नाही. त्यामुळे भाजपच्या या आरोपांची तपास यंत्रणा कशी दखल घेणार, रोहित पवार यावर काय प्रत्युत्तर देणार आणि अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासातून आणखी कोणते धागेदोरे समोर येणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!