दिवाळी संपली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार आलेच नाहीत, सरकारने ८२ हजार शेतकऱ्यांना दिला दगा.. उद्धवसेनेचा सरकारला थेट इशारा


अकोला : दिवाळीपूर्वी आर्थिक मदतीचा शब्द देऊनही हजारो शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडल्याचा आरोप आता राज्य सरकारवर होत आहे. अकोला जिल्ह्यातील तब्बल ८२ हजार पात्र शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रीम मदत अद्याप मिळाली नसल्याचा दावा उद्धवसेनेचे उपनेते आणि आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. विशेष म्हणजे, मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आता आंदोलनाच्या माध्यमातून सरकारसमोर मांडण्याची तयारी उद्धवसेनेने केली आहे.

मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नितीन देशमुख यांनी सरकारच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यात ३ लाख ६ हजार शेतकरी मदतीसाठी पात्र आहेत. मात्र, त्यापैकी ८२ हजार शेतकऱ्यांना अद्याप पाच हजार रुपये मिळालेले नाहीत. भाजपच्या स्थानिक खासदार आणि आमदारांची पाच हजार रुपयांत दिवाळी साजरी झाली का, असा खोचक सवाल करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

पाच हजार नव्हे, थेट एक लाख रुपयांची मागणी!

विदर्भातील कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे सरकारने प्रत्येक दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला सरसकट एक लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी देशमुख यांनी केली. ही मागणी मान्य न झाल्यास हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर विदर्भातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आंदोलन केले जाईल. तसेच संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला.

चार महिन्यांत ६४ आत्महत्या; सरकारवर गंभीर आरोप

देशमुख यांनी मांडलेल्या आकडेवारीनुसार, मागील चार महिन्यांत अकोला जिल्ह्यात ६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर राज्यात मागील नऊ महिन्यांत २२२ शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याचा दावाही त्यांनी केला. वाढत्या आत्महत्यांवरून सरकारच्या शेतकरी धोरणावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

तीन मंत्र्यांनी दिलेला शब्द कुठे गेला?

२० सप्टेंबर रोजी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे अकोल्यात आले होते. त्यानंतर २३ सप्टेंबरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळापूर तालुक्यातील शेतांची पाहणी केली, तर ३० सप्टेंबरला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अकोल्यात आले होते. या तिन्ही मंत्र्यांनी दिवाळीपूर्वी अग्रीम मदत देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते पूर्ण झाले नसल्याचा आरोप देशमुख यांनी केला. स्थानिक भाजप लोकप्रतिनिधींच्या मौनावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

या पत्रकार परिषदेला गोपाल दातकर, मुकेश मुरूमकार, योगेश्वर वानखडे, सुरेंद्र विसपुते, अतुल पवनीकर, भूषण भिरड, आशिष गावंडे, राहुल कराळे, अभय खुमकर, ज्ञानेश्वर म्हैसने, संजय भांबेरे आणि किरण अवताडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

अकोला महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दाही ऐरणीवर

दरम्यान, अकोला महापालिकेतील कोट्यवधी रुपयांच्या योजनांमध्ये कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही देशमुख यांनी केला. काही भाजप लोकप्रतिनिधींसाठी महापालिका भ्रष्टाचाराचे कुरण बनल्याचा दावा करत संबंधित प्रकरणांचा लवकरच पर्दाफाश करण्याचा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे शेतकरी मदतीच्या प्रश्नासोबतच महापालिकेतील कथित गैरव्यवहारावरूनही अकोल्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!