अजित पवारांचा अपघात की घातपात? AAIBच्या अहवालाकडे लक्ष; महिन्याभरात चित्र स्पष्ट होणार?


पुणे : अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर आता एका महिन्यात अहवाल जारी करण्याचे आश्वासन AAIBकडून मिळाल्याचा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शन एनजीओचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला आहे.

त्यामुळे अजित पवार यांच्या विमान अपघातामागील नेमके कारण काय होते, याबाबतचा अहवाल महिनाभरात समोर येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अजित पवार यांचा विमान अपघात होता की घातपात, असा सवाल उपस्थित करत हेमंत पाटील यांनी तक्रार दाखल केली होती. याच तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी आज AAIBच्या कार्यालयात जाऊन महासंचालकांची भेट घेतल्याची माहिती दिली आहे. या भेटीनंतर महिनाभरात अपघातासंदर्भातील प्रश्नांची उत्तरे मिळतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

याबाबत बोलताना हेमंत पाटील यांनी सांगितले की, अजित पवार यांच्या अपघाताबाबत सुरुवातीला बारामतीमध्ये तक्रार केली होती. मात्र या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर तहसीलदारांची भेट घेतली; परंतु तिथेही अपेक्षित दखल न घेतल्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी या प्रकरणाचा तपास AAIBकडून सुरू असल्याचे न्यायालयाकडून सांगण्यात आल्याचे पाटील यांनी म्हटले.

त्यानंतर जून महिन्यात AAIBकडे यासंदर्भात तक्रार दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र तक्रारीवर कोणतेही उत्तर मिळाले नसल्याने आज AAIBच्या महासंचालकांची भेट घेतल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

AAIBच्या महासंचालकांनी तपास एका महिन्यात पूर्ण करून अजित पवार यांच्या विमान अपघाताचा अहवाल जारी करण्याचे सांगितल्याचा दावा हेमंत पाटील यांनी केला आहे. तसेच एका महिन्यात अहवाल मिळाला नाही, तर पुन्हा उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळावर विमान उतरत असताना ही दुर्घटना घडली होती. विमान जमिनीवर कोसळल्याने झालेल्या या दुर्घटनेत अजित पवार यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर विमान दुर्घटनेच्या कारणांबाबत विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

आता AAIBच्या तपासातून या दुर्घटनेमागील नेमके कारण काय समोर येते, तसेच तक्रारीत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे अहवालातून मिळतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!