८५ वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात… शरद पवार जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर; या तारखेपासून दुष्काळी दौरा

पुणे : राज्यात पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक जिल्ह्यांमध्ये कमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांना उभ्या पिकांवर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
राज्य सरकारने ५ ऑक्टोबरपासून दुष्काळी परिस्थितीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, पंचनामे कधी होणार आणि त्यानंतर मदत कधी मिळणार, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. तोपर्यंत काय करायचे, अशी चिंता शेतकऱ्यांमध्ये आहे.

या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे २८ सप्टेंबरपासून दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. पवार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.


शरद पवारांच्या दौऱ्याचा कार्यक्रम आखण्यात आला असून, ते दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. दरम्यान, रोहित पवार यांनीही दुष्काळी भागाची पाहणी सुरू केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
यापूर्वी शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या पत्रातून पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे एकूण ९ प्रमुख मागण्या केल्या आहेत.
पवारांच्या ९ प्रमुख मागण्या
१) तत्काळ दुष्काळ जाहीर करावा
राज्यातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता औपचारिक निकषांची प्रतीक्षा न करता तत्काळ दुष्काळ जाहीर करण्यात यावा. गंभीर परिस्थिती असलेल्या तालुक्यांना दुष्काळसदृश परिस्थितीग्रस्त घोषित करून दुष्काळी सवलती लागू करण्यात याव्यात.
२) शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत
शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपये मदत जाहीर करावी. तसेच शेतमजूर कुटुंबांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची विशेष मदत देण्यात यावी.
३) कर्जमाफी आणि पीककर्ज उपलब्ध करून द्यावे
आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी योजनेची तातडीने अंमलबजावणी करावी आणि तत्काळ पीककर्ज उपलब्ध करून द्यावे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान ५० हजारांवरून १ लाख रुपये करावे. तसेच २०२५-२६ मध्ये पीककर्ज घेऊन यंदा थकीत झालेल्या शेतकऱ्यांचाही कर्जमाफी योजनेत समावेश करावा.
४) पीकविमा योजनेचा लाभ द्यावा
एक रुपयात पीकविमा योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी. शेतकरी हिताचे पूर्वी वगळलेले सर्व ट्रिगर पूर्वलक्षी प्रभावाने लागू करून शेतकऱ्यांना पीकविम्याचे संरक्षण द्यावे. तसेच गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी जाहीर करण्यात आलेली हेक्टरी १७ हजार रुपयांची पीकविमा मदतही तत्काळ वितरित करावी.
५) रोजगार हमी आणि टँकरची व्यवस्था करावी
दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विशेष योजना राबवावी. शेती, जलसंधारण तसेच इतर कामे करून घ्यावीत. फळबागा वाचवण्यासाठी टँकरची व्यवस्थाही सुरू करावी.
६) पाणी आणि चारा छावण्यांची व्यवस्था करावी
पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेल्या गावांचे तत्काळ सर्वेक्षण करून आवश्यकतेनुसार शासकीय टँकर सुरू करावेत. तसेच मागणीनुसार तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात. पशुधनासाठी पिण्याचे पाणी आणि आवश्यक पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्याव्यात.
७) वीजपुरवठ्याबाबत विशेष मोहीम राबवावी
दुष्काळाच्या काळात लोडशेडिंगच्या समस्या वाढत असल्याने विद्युत रोहित्रांच्या दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी ऊर्जा विभागाच्या माध्यमातून विशेष मोहीम राबवावी.
८) नियंत्रण कक्ष सुरू करावेत
प्रत्येक जिल्ह्यातील पर्जन्यमान, पिकांची स्थिती, पाणीटंचाई, चारा उपलब्धता आणि पशुधनाची स्थिती यावर दररोज देखरेख ठेवण्यासाठी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष सुरू करावेत.
९) विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे
दुष्काळसदृश परिस्थितीग्रस्त तालुक्यांतील शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये केवळ परीक्षा शुल्क माफ न करता विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा.
दरम्यान, शरद पवारांच्या या दौऱ्यात ते दुष्काळी भागातील परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेणार असून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यातून दुष्काळग्रस्त भागातील प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पुन्हा अधोरेखित होण्याची शक्यता आहे.