‘या’ बँकेत तुमचंही खातं आहे का? तर सावधान.. ग्राहकांच्या खात्यांतून १०.२४ कोटी गायब; तीन वर्षे सुरू होता पैशांचा खेळ, महिला कर्मचाऱ्यासह दोघे जाळ्यात!


ग्रेटर नोएडा : बँकेत पैसे ठेवले की ते सुरक्षित राहतील, असा ग्राहकांचा विश्वास असतो. मात्र, पंजाब नॅशनल बँकेच्या एका शाखेत समोर आलेल्या कथित घोटाळ्याने याच विश्वासाला धक्का दिला आहे. ग्राहकांना कोणतीही माहिती न देता त्यांच्या खात्यांमधून तब्बल १० कोटी २४ लाख रुपये काढल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार गेल्या तीन वर्षांपासून सुरू असल्याचा संशय असून, याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) एका महिला बँक कर्मचाऱ्यासह दोघांना अटक केली आहे.

ग्राहकांच्या खात्यांतून कोट्यवधी रुपये गायब!

ग्रेटर नोएडातील सेक्टर एक परिसरात असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत हा कथित गैरव्यवहार घडला. ग्राहकांच्या संमतीशिवाय त्यांच्या खात्यांमधून रक्कम काढण्यात आल्याचा आरोप आहे. अशा व्यवहारांच्या माध्यमातून तब्बल १०.२४ कोटी रुपये काढण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तीन वर्षांच्या कालावधीत हा प्रकार सुरू राहिल्याने बँकेच्या व्यवहारांवर आणि अंतर्गत देखरेखीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

बँकेतील महिला कर्मचाऱ्यालाच अटक

या प्रकरणात दीपांशी नावाच्या महिला कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. ती सेक्टर एकमधील संबंधित शाखेत कार्यालयीन सहाय्यक म्हणून कार्यरत होती. तिच्यासोबत आशुतोष पाठक यालाही सीबीआयने अटक केली आहे. आशुतोषला पुण्यातून पकडण्यात आल्याची माहिती आहे. या दोघांनी काही अज्ञात साथीदारांच्या मदतीने ग्राहकांच्या खात्यांमधील पैसे परस्पर काढल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे.

एका महिलेच्या तक्रारीने उघड केला मोठा प्रकार

एका महिला ग्राहकाने तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. त्यातून बँकेतील संशयास्पद आर्थिक व्यवहारांचा तपशील समोर आला. याप्रकरणी २९ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सीबीआयने तपासाची दिशा निश्चित करत दोघांना अटक केली.

आणखी कोणाचा सहभाग? पैशांचा माग काढण्याचे आव्हान

१०.२४ कोटी रुपयांची रक्कम नेमकी कोणत्या मार्गाने काढण्यात आली, ती कुठे वळवण्यात आली आणि या कथित गैरव्यवहारात आणखी किती जण सहभागी आहेत, याचा तपास सुरू आहे. अज्ञात आरोपींची भूमिकाही तपासली जात आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, बँकेतील ग्राहकांच्या खात्यांमधूनच इतकी मोठी रक्कम परस्पर काढल्याचा आरोप समोर आल्याने ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!